गोदाघाट, सिग्नलवरून थेट मुख्य प्रवाहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - कुणीतरी येईल अन्‌ खायला दोन घास किंवा चार पैसे देईल, या अपेक्षेने ते आजवर येणाऱ्या-जाणाऱ्या चारचौघांकडे पाहत होते. ऊन, वारा अन्‌ थंडीची तमा न बाळगता, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी निर्विकार बसून राहणाऱ्या भिक्षेकऱ्यांची ही दैनंदिनी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका अनपेक्षित निर्णयाने अचानक बदलली. अचानक एखाद्या दानशूराने येऊन पोटभर अन्नच नव्हे, तर राहायला घरही देऊन जावे तद्वतच या आदेशाने सोमवारी (ता. ७) शहरातील ११५ भिक्षेकऱ्यांना गोदाघाट, विविध मंदिरे, गजबजलेली बाजारपेठ आणि सिग्नलवरून थेट मुख्य प्रवाहात आणले.

शहरातील ११५ भिक्षेकऱ्यांना सोमवारी (ता. ७) पोलिसांनी थेट मुख्यालयाच्या आवारात आणले. त्यांना न्हाऊ घालून चांगले कपडे परिधान करायला दिले. लहान मुले, पुरुषांची दाढी-कटिंग केली अन्‌ चांगले जेवणही दिले. 

मुख्यालयाच्या आवारातील बॅरेक १७ येथे त्यांना आंघोळ घालण्यात आली. चांगले कपडे, चहा- नाश्‍ता देण्यात आला. त्यानंतर त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. लहान मुले, पुरुषांची कटिंग, दाढी करण्यासाठी सलून व्यावसायिकालाही पाचारण करण्यात आले होते. दुपारी सर्वांना गोडधोड जेवण देण्यात आले.

पोलिस आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा शाखेने सेवाभावी संस्थांच्या मदतीने भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या संस्थांकडे त्यांची रवानगी केली. भिक्षेकऱ्यांमध्ये ५२ पुरुष होते. त्यांची रवानगी विसापूर येथील पुनर्वसन केंद्रात करण्यात आली. ३० महिलांची पुण्यातील महिलांच्या पुनर्वसन केंद्राकडे करण्यात आली. १६ मुले मनमाडच्या बालनिरीक्षणगृहात, तर ११ मुले मालेगावच्या बालनिरीक्षणगृहात रवाना झाली. सहा मुलींना नाशिकच्या मुलींच्या वत्सालयात दाखल करण्यात आले. हा उपक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलिस आयुक्तालय, महिला व बालविकास विभाग आणि चाइल्ड लाइन, चाइल्ड वेल्फेअर समिती, जिल्हा रुग्णालयातर्फे राबविण्यात आला.

स्वयंरोजगाराचेही प्रशिक्षण
भिक्षेकऱ्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविला गेला. भिक्षेकऱ्यांना ज्या पुनर्वसन संस्थांमध्ये दाखल केले जाणार आहे, त्याठिकाणी पुरुष-महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाईल. या संस्थांकडे शेती असून, त्यात काम करून त्यांना आर्थिक रोजगारही मिळेल. लहान मुलांना बालनिरीक्षणगृहाच्या माध्यमातून शिक्षणांची कवाडे खुली होणार आहेत, हा या उपक्रमांमागील उद्देश आहे.

Web Title: godaghat signal begger police humanity motivation