प्रवाशांवर शस्त्र उगारल्याने गोदावरी एक्‍स्प्रेसमध्ये गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

मनमाड स्थानकावरून मुंबईकडे जाताना दरवेळी पौर्णिमेला असे प्रकार होतात. रेल्वेत शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना बोगीत येण्यास मज्जाव करण्यापासून तर दरवाजे बंद करण्यापर्यंतची दादागिरी चालते. पोलिसांनी त्याला आळा घालावा.
- भाऊसाहेब आव्हाड, अध्यक्ष, निफाड रेल्वे प्रवासी संघटना 

नाशिक : गोदावरी एक्‍स्प्रेसमध्ये जागेच्या क्षुल्लक वादातून आज एकाने डब्यातील इतर प्रवाशांवर शस्त्रच उगारल्याने गोंधळ झाला. रेल्वे पोलिसांनी नाशिक रोडला प्रवाशाला उतरवून घेत समज दिली, तर निफाड रेल्वे प्रवासी संघटनेने हा कायमचा त्रास असल्याची तक्रार केली आहे. 

मनमाडहून सकाळी नाशिकला येणाऱ्या गोदावरी एक्‍स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. मनमाडहून नाशिकला येणाऱ्या गोदावरीत विविध स्थानकांत प्रवासी वाढत गेल्याने जागेच्या वादातून लासलगावच्या पुढे आल्यानंतर मनमाड गुरुद्वारातून दर्शन घेऊन मुंबईला निघालेल्या तजेंदरपाल सिंग या शीख प्रवाशाशी स्थानिक प्रवाशांचे वाद झाले. बसण्याच्या जागेवर झोपू नका, त्याऐवजी महिलांना नाशिकपर्यंत जागा देण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन त्यात, संबंधित शीख प्रवाशाने थेट शस्त्र काढून प्रवाशांना धमकावणे सुरू केल्याने वाद विकोपाला गेला. 

 
प्रत्येक पौर्णिमेला वाद
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना हा प्रकार समजल्यानंतर एकच गोंधळ सुस्रू झाला. दर पौर्णिमेला मनमाडहून मुंबईला परतणाऱ्या शीख प्रवाशांचे स्थानिक मासिक पासधारकांशी वाद होतात. त्यात, चाकरमान्यांना त्रास सोसावा लागतो, अशी निफाड प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. बसण्याच्या जागांवर झोपून घेत, महिला-मुलांना जागा देत नाहीत. जागा मागितल्यास थेट "कृपान‘ हे शस्त्रच काढून धमकाविले जात असल्याने गोंधळ होतात अशा तक्रारी आहेत. नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी गाडी स्थानकात आल्यावर संबंधिताला ताब्यात घेऊन काही तास पोलिस ठाण्यातच बसवत पुन्हा असा प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्याचे सांगत त्याला समज देऊन सोडून दिले.

 

Web Title: Godavari Express passengers confusion weapon