‘गोदावरी-निलगंगा’ पुन्हा लुप्त होणार

concrete
concrete

नाशिक - गोदावरीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी पुन्हा दुसऱ्यांदा लुप्त होणार आहे. एवढेच नव्हे, तर निलगंगा नदीपात्रावर काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा काँक्रिटीकरण केलेल्या नद्यांवर पुन्हा दुसऱ्यांदा (लेअर) काँक्रिटीकरणाचे केवळ कारण दिले जात आहे. पण प्रत्यक्षात या नद्या लुप्तच होणार आहेत.

पालिकेने त्र्यंबकेश्‍वरला गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे फेररेखांकन करण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. त्यावर कुठलाचा निर्णय झालेला नसताना (जलसंपदाचे निळ्या पूररेषेचे रेखांकन कायम असताना) उगमस्थानी पूररेषेतील काँक्रिटीकरणावर फेरकाँक्रिटीकरणाचा हा खटाटोप कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोमवारी (ता. १०) निविदा उघडल्या जाणार आहेत. जगभर पर्यावरण सप्ताह साजरा होत असताना त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी आणि निलगंगा अशा दोन्ही नदीपात्रांवर पूर्वी केलेल्या काँक्रिटीकरणावर नव्याने फेरकाँक्रिटीकरणातून उगमस्थानी नद्या गाडण्याचा हा प्रकार घडतो आहे.

काँक्रिटीकरणाच्या नऊ कामांसाठी निविदा काढल्या आहेत. त्यात निविदेत सहा क्रमांकाची निलगंगा पाइप गटार व रस्ता काँक्रिटीकरणाची एक निविदा असून, सातव्या क्रमांकाचे काम लक्ष्मीनारायण चौक ते गायत्री मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण असे म्हटले आहे. बारा वर्षांपूर्वी गोदावरी नदीप्रवाह गाडून त्यावर लक्ष्मीनारायण चौक ते गायत्री मंदिर अशा नावाने पालिकेने रस्ता करून नदीपात्रावर काँक्रिटीकरण करून नदी गाडून टाकली. निलगंगा नदीप्रवाहावरसुद्धा काँक्रिटीकरण करून निलगंगा पाइपलाइनमधून बंदिस्त केली. आता पुन्हा याच गाडलेल्या नद्यांवर (पालिकेच्या उल्लेखानुसार रस्त्यावर) आणखी एक काँक्रिटीकरणाचा भराव टाकून दुसऱ्यांदा गोदावरी आणि निलगंगा अशी दोन्ही नदीपात्रे गाडली जाणार आहेत.  

‘डीपी’त रस्ते नव्हे नद्याच
पालिकेच्या डीपी आराखड्यात हे दोन्ही प्रवाह रस्ते नव्हे, तर गोदावरी व निलगंगा या त्र्यंबकेश्‍वरला उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रवाह असल्याचे म्हटले आहे. त्यावरूनच या भागातील कार्यकर्त्या ललिता शिंदे व राजेश पंडित यांनी नदीपात्रावरील काँक्रिटीकरणाविरोधात राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने नद्यांच्या पात्रात कुठलेही काम करण्यास, नदीप्रवाह बंदिस्त करण्यास प्रतिबंध करत जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. असे असताना ‘रस्ता’ असा उल्लेख करत सरसकट उगमस्थानी नदीपात्र गाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नदीपात्रात कामाच्या निविदा काढलेल्या नाहीत. ज्या निविदा आहेत, त्या यापूर्वीच जे काँक्रिटीकरण आहे त्याच्या काँक्रिटीकरणाच्या खराब झालेल्या भागाच्या व्यवस्थित डागडुजी करण्याच्या कामाच्या निविदा आहेत. नद्यांचे पूररेषेचे रेखांकन करण्याचा विषय जलसंपदाचा आहे. रेखांकनासाठी पालिकेने पैसे भरले आहेत.
- चेतना केरुरे, मुख्याधिकारी

त्र्यंबकेश्‍वरला उगमस्थानी काँक्रिटीकरण करून नद्यांचे उगमस्थान लुप्त करण्याला विरोध आहे. दोन सरकारी यंत्रणा ‘नदी आणि नाले’ असे शाब्दिक बुद्धिभेद करून नैसर्गिक जलस्रोत गाडत असल्याने त्याविरोधात कोर्टात गेली आहे. त्यानंतरही पूररेषेतील जलस्रोतावर सिमेंट ओततात कसे?
- ललिता शिंदे, याचिकाकर्त्या  

उगमापासून तर अखेरपर्यंत गोदावरीच काय तिच्या सगळ्याच उपनद्यांत काम करण्याला, त्यांचे प्रवाह वळविण्याला न्यायालयाचीच परवानगी नाही. पण निळ्या पूररेषेत काम करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद, मेरीसह विविध यंत्रणांची परवानगी घेतली पाहिजे. न्यायालयाने यापूर्वीच मेरी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे.
- राजेश पंडित, याचिकाकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com