नाशिकमधून सोनसाखळ्या चोरून मजा लुटायला गेला अजमेरला...त्यानंतर...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

गेल्या 28 ऑगस्टला सकाळी सातला हिरावाडीत पहिली, त्यानंतर काठे गल्लीत दुसरी, तर गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन येथे तिसरी सोनसाखळी ओढून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना तांत्रिक माहितीच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी इराणी टोळीतील संशयित फिरोज बेग याचा शोध घेतला होता. तो अजमेर येथे असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

नाशिक : ऑगस्टमध्ये एकाच दिवशी तीन सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या गुन्ह्यातील संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी अजमेरमधून (राजस्थान) अटक केली आहे. सर्फराज ऊर्फ फिरोज बेग (वय 29, रा. टीचर्स कॉलनी, अजमेर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. त्यास जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सोनसाखळी चोरट्याला अजमेरमधून अटक 
गेल्या 28 ऑगस्टला सकाळी सातला हिरावाडीत पहिली, त्यानंतर काठे गल्लीत दुसरी, तर गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन येथे तिसरी सोनसाखळी ओढून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना तांत्रिक माहितीच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी इराणी टोळीतील संशयित फिरोज बेग याचा शोध घेतला होता. तो अजमेर येथे असल्याची माहिती मिळताच सरकारवाड्याचे उपनिरीक्षक राठोड, हवालदार शेळके, वाघमारे, मरकड, जगदाळे यांच्या पथकाने संशयित बेग याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. त्यास रविवारी (ता. 17) जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने येत्या मंगळवार (ता. 19)पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस चौकशीतून आणखीही सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्‍यता आहे. संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील, उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विभागाचे पोलिस निरीक्षक इरफान शेख, उपनिरीक्षक राठोड यांच्या पथकाने बजावली आहे. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

अन्य मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता 
28 ऑगस्टला सुरेखा राजेंद्र उपासणी (वय 62) यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी संशयित सोनसाखळी चोरट्यांनी काठेगल्लीत पत्ता विचारण्याचा बहाण्याने पादचारी महिला शालिनी रघुनाथ सोनांबेकर (वय 70) यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 15 मिनिटांनी संशयित सोनसाखळी चोरट्यांनी गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनच्या पाठीमागील रस्त्यावर पादचारी 55 वर्षीय मीनाक्षी शिवाजी आव्हाड यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold smuggler arrested in Ajmer Nashik Crime News