भुसावळला उसनवारीच्या पैशांतून गोळीबार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

भुसावळला उसनवारीच्या पैशांतून गोळीबार 

भुसावळला उसनवारीच्या पैशांतून गोळीबार 

भुसावळ : उसनवारीने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून सराईत गुन्हेगाराने युवकावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून जखमी केल्याची घटना काल (ता. 27) रात्री सात ते साडे सात दरम्यान नाहाटा कॉलेज चौफुलीवरील हॉटेल गजानन जवळ घडली. सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी तपासचक्रे फिरवून चार संशयितांना आज अटक केली आहे. 
पोलिसांनी सांगितले, की गंगाराम प्लॉटमधील रहिवासी सागर विनायक पत्की (वय 29, रा. सुराणा हॉस्पिटलमागे, भुसावळ) याने संशयित आरोपी हेमंत निंभोरे याच्याकडून 35 हजार रुपये उसनवारीने घेतले होते. त्यापैकी 8 हजार रुपये परत केले नाही म्हणून हेमंतने सागरकडे तगादा लावला. पैसे मिळत नाही म्हणून हेमंतने त्याचा मित्र, सराईत गुन्हेगार योगेश तायडे यांची मदत घेतली. सागरने पैसे द्यावे म्हणून काल (ता. 27) तायडेने फोन करून सागरला सायंकाळी नाहाटा कॉलेज चौफुलीवर भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा सागरने तुझ्याशी आपला काही संबंध नसल्याने तुला पैसे देणार नाही असे योगेशला सांगितले होते. सायंकाळी आपल्या मित्रासह सागर नाहाटा कॉलेज चौफुलीवर गेला. तेव्हा चारचाकी गाडीतून योगेश तायडे व त्याचे काही साथीदार आले. त्यांनी सागरकडे पैशांची मागणी केली. पैसे देत नाही म्हणून तायडेने शिवीगाळ करून गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार केला. नंतर हेमंत निंभोरे, अनोळखी युवकांनी सागरला मागून पकडले. तायडेने सागरच्या डोक्‍याला कट्टा लावून मारहाण केली. नंतर पुन्हा सागराला चापटा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. नंतर तायडेने सागरच्या पायावर गोळी चालविल्याने तो जखमी झाला. त्यानंतर संशयित पसार झाले. जखमी सागरला त्याच्या मित्राने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आज जखमी सागरने फिर्याद दिली. संशयित सागर तायडे, हेमंत निंभोरे, हरीश लोखंडे व अनोळखी युवकाला आज दुपारी दोनला सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, संजय भदाणे, हवालदार विकास सातदिवे, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, बंटी कापडणे यांच्या पथकाने महेश नगरातील सिंधी स्मशानभुमीजवळून कट्ट्यासह अटक केली. उपनिरीक्षक विजय नरवाडे तपास करीत आहे. 
 

Web Title: golibar