'गंगापूर'च्या साठ्यात 12.5 दशलक्ष घनफुटांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

‘गंगापूर‘मध्ये लहान जलाशय 
गंगापूर धरणाच्या गिरणारे गावाच्या बाजूने मागील दोन महिन्यांपासून गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे 30 फूट खोलीचे नवीन लहान धरणच तयार झाले आहे. मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्यामुळे या भागात जलाशय निर्माण होऊन त्याची क्षमता जवळपास 12.44 दशलक्ष घनफूट आहे. लोकसहभागातून काही लाखांमध्ये सरकारी दरानुसार दोन कोटींचे काम झाले आहे.

नाशिक : ‘सकाळ‘, आर्ट ऑफ लिव्हिंग, जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून मागील दोन महिन्यांमध्ये साडेतीन लाखांपेक्षा अधिक घनमीटर गाळ काढला. यामुळे शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन सुपीक करण्याबरोबरच साडेबारा दशलक्ष घनफूट म्हणजेच 20 लाख लोकांची एक दिवसाची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकेल, एवढा साठा वाढला आहे. दोन दिवसांपासून पावसाच्या सरी सुरू झाल्यामुळे आता ही मोहीम तात्पुरती थांबली आहे. 

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाल्यामुळे धरणांमधील साठा कमी झाला. त्यात समन्याय पाणीवाटप धोरणानुसार मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्यामुळे नाशिक शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गंगापूर धरणातील गाळ काढून धरणाची साठवणक्षमता वाढविणे शक्‍य असल्याने लोकसहभागातून या धरणातून गाळ काढण्याच्या मोहिमेस 21 मेस प्रारंभ झाला. जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन यांनी याबाबतची तांत्रिक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग व "सकाळ‘ यांच्या पुढाकारातून गाळ काढण्याच्या मोहिमेस पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक विजय हाके यांच्या मार्गदर्शनाखाली संजय खैरनार, निवृत्ती काकड, अशोक गवळी, संजय बडवर आदी स्वयंसेवकांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन धरणातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी वाहून नेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मखमलाबाद, मातोरीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने हा गाळ वाहून नेला. सुरवातीला धरणाच्या केवळ गिरणारेच्या बाजूने खोदकाम सुरू होते; परंतु धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्‍वर परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर तेथेही गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते सतत दोन महिने या कामावर देखरेख ठेवून शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्याचे नियोजन करीत होते. या मोहिमेतून गंगापूर धरणामधून जवळपास तीन लाख 51 हजार घनमीटर गाळ काढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील साडेबारा दशलक्ष घनफूट साठा वाढला असून, त्या पाण्यातून नाशिकच्या 20 लाख लोकसंख्येची एक दिवसाच्या पाण्याची गरज भागणार आहे. 

Web Title: Good rain in catchment area of Gangapur Dam