
Dhule Crime News : नशेच्या औषधांसह लाखाचा माल जप्त; शहर पोलिस पथकाची कारवाई
धुळे : शहर पोलिसांनी शहरातील ग्रीन पार्क परिसरातील खांडल विप्र भवनजवळ छापा टाकत ५० हजारांच्या गुंगीकारक, नशेच्या (Drugs) औषधांसह लाखाचा मुद्देमाल जप्त केला. (Goods worth lakhs along with drugs seized from Green Park area dhule crime news)
ही कारवाई बुधवारी (ता. २२) मध्यरात्री केली. या प्रकरणी संशयित तिघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
शहरातील तीन जण वाहनाने मालेगाव रोडने मानवी शरीर व मेंदूवर विपरित परिणाम होईल, अशा गुंगीकारक औषधांच्या बाटल्या चोरीने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली.
त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. अन्न व औषध निरीक्षक किशोर देशमुख यांच्यासह पथकाने मालेगाव रोडकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या खांडल विप्र भवनजवळ बुधवारी रात्री साडेअकराला सापळा रचत तिघा संशयितांना पकडले.
त्यांच्याकडून गुंगीकारक कॉडी न्यू सीरप नामक शंभर एमएलच्या ४८ हजारांच्या ३०० प्लॅस्टिक बाटल्या, दोन दुचाकी, तीन मोबाईल व रोख दोन हजार २०० रुपये, असा ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या प्रकरणी शाबीर शहा भोलू शाह (रा. ऐंशी फुटी रोड, रमजान बाबानगर, धुळे), कलीम शाह सलीम शाह (रा. शिवाजीनगर, ऐंशी फुटी रोड, धुळे) व सद्दाम हुसेन फरीद अन्सारी (रा. ताशा गल्ली, क्रमांक ७, सुलतानिया चौक, धुळे) अशी संशयितांची नावे असून,
त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही अधिकृत परवाना किंवा शिक्षण नसताना आर्थिक फायद्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक नशा येणारा औषधीसाठा आढळला व तो बेकायदेशीरपणे चोरटी विक्रीसाठी नेला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, प्रशांत राठोड, विजय शिरसाट, मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाईत, महेश मोरे, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, अविनाश कराड, नीलेश पोतदार, तुषार मोरे, प्रसाद वाघ, शाकीर शेख, गुणवंतराव पाटील, किरण भदाणे व शाकीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.