गोवर्धन डोंगराला आग; 70 एकरातील चारा खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

लामकानी (ता. धुळे) - येथील ग्रामस्थांनी अपार कष्टातून संवर्धित केलेल्या गोवर्धन डोंगराला आज दुपारी आग लागून 60 ते 70 एकरांतील हजारो टन कोरडा चारा खाक झाला. आग लागलेल्या डोंगरावर मध्यभागी वाहन जाऊ शकत नसल्याने आग विझविण्यासाठी ग्रामस्थ, तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी जीव धोक्‍यात घालून तीन तासांच्या संघर्षानंतर आग आटोक्‍यात आणली.

लामकानी (ता. धुळे) - येथील ग्रामस्थांनी अपार कष्टातून संवर्धित केलेल्या गोवर्धन डोंगराला आज दुपारी आग लागून 60 ते 70 एकरांतील हजारो टन कोरडा चारा खाक झाला. आग लागलेल्या डोंगरावर मध्यभागी वाहन जाऊ शकत नसल्याने आग विझविण्यासाठी ग्रामस्थ, तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी जीव धोक्‍यात घालून तीन तासांच्या संघर्षानंतर आग आटोक्‍यात आणली.

दरम्यान, ही आग हेतुपुरस्सर लावली गेल्याची चर्चा आहे. अपघाताने आग लागावी, अशी कुठलीही स्थिती नाही. विशेष म्हणजे ही आग डोंगराच्या मधोमध लावली गेली आहे.

येथील इंग्लिश स्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना आज दुपारी दीडच्या सुमारास डोंगरावर धूर निघताना दिसला. त्यांनी ही बातमी लगेच शिक्षकांना सांगितली. त्यांनी ही बातमी जंगल संवर्धनाचे प्रणेते धुळेस्थित डॉ. धनंजय नेवाडकरांना कळवून शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत डोंगरावर आग लागलेले ठिकाण गाठले. दुसरीकडे डॉ. नेवाडकरांनी ग्रामस्थांना तातडीने आग विझविण्यासाठी पाण्याने भिजलेले गोणपाट नेण्याची सूचनाही केली. डोंगरावर तरुण पोहोचेपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावाकडील चारा वाचविला; परंतु हवेच्या जोराने आगीने रौद्र रूप धारण केल्याने डोंगरमाथ्याकडील गवताने वेगाने पेट घेतला.

ओले गोणपाट घेऊन आलेले तरुणही आगीचे तांडव बघून क्षणभर थबकले; पण तशाही स्थितीत आग विझविण्याची विद्यार्थ्यांची हिंमत पाहून तरुणांनी जोर लावला. शेवटी तीन तासांच्या संघर्षानंतर दुपारी साडेचारला आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.

अनेक तरुण जखमी
डोंगरावर पाणी झिरपण्यासाठी सलग समतल चर केले असल्याने आग विझविताना कोणी पाय घसरून पडले, तर कोणाचे केस, कोणाचे शर्ट- पॅंट, कोणाची चप्पल जळाली. अनेकांना चटके बसले; परंतु जिवाची पर्वा न करता गावाने सांभाळलेला डोंगर अखेर तरुणांसह विद्यार्थ्यांनी वाचविला. तत्पूर्वी, धुळ्याहून डॉ. नेवाडकर निघाले होते. ते मिनिटामिनिटाला घटनेची माहिती घेत होते. तरुण व विद्यार्थी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे समजल्याने त्यांच्या जिवात जीव आला. धुळ्याहून निघताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी संत्री व पेरू घेतले.

विद्यार्थ्यांचे केले कौतुक
डॉ. नेवाडकरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कुठल्याही शाबासकीने तुमच्या शौर्याचे कौतुक होऊ शकत नाही; परंतु अथक प्रयत्नांती थोडी एनर्जी मिळावी म्हणून संत्री व पेरू आणले, असे सांगून भविष्यात अशाच प्रकारे जागरूक राहून डोंगरसंवर्धनाचे काम तुम्हालाच करावयाचे आहे, असे सांगून विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व गावातील तरुणांचे कौतुक केले.

गावाने केले आहे संवर्धन!
लामकानी गावाने डॉ. धनंजय नेवाडकरांच्या मार्गदर्शनाखाली गावालगत असलेला गोवर्धन डोंगर संवर्धित करून 360 हेक्‍टरवर कुरण विकासाचे काम करून बोडका डोंगर "सुजलाम्‌- सुफलाम्‌' केला आहे. या कुरण विकासातून लामकानी गाव पाणी व चाऱ्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. डोंगरावरील हजारो टन चारा लामकानीसह परिसरातील खेड्यांतील जनावरांची भूक भागवितो.

Web Title: govardhan hill fire