सरकारी रुग्णालये 'व्हेंटिलेटर'वर

Medicine
Medicine

नाशिक - राज्यातील सरकारी रुग्णालये औषधांच्या पुरवठ्याअभावी "व्हेंटिलेटर'वर पोचली आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा- ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना पावसाळ्यात पोचणे अपेक्षित असलेली औषधे साथीच्या आजाराने थैमान घातले असले, तरीही अद्याप पोचलेली नाहीत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आरोग्य सेवा संचालनालयास एकूण प्राप्त वार्षिक निधीच्या दहा टक्‍क्‍यांपर्यंतची खरेदी स्थानिक स्तरावर करण्यास सरकारने मान्यता दिली.

सरकारने जूनमध्ये स्थानिक स्तरावर औषधे खरेदी करण्यास परवानगी दिली असली, तरीही तीन महिन्यांपासून खरेदी निविदा प्रक्रियेत आहे. मधुमेह, जुलाब, ताप, थंडी, सर्पदंश, श्‍वानदंश आणि शस्त्रक्रिया अशा महत्त्वाच्या 67 प्रकारच्या औषधांचा त्यात समावेश आहे. जिल्हा स्तरावर सर्वसाधारणपणे एक कोटी रुपयांपर्यंतची खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेतील औषधे दिवाळीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांत पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाला 750 आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 355 प्रकारच्या औषधांपैकी आतापर्यंत 215 प्रकारची औषधे उपलब्ध झाली आहेत. एकूण 284 प्रकारच्या औषधांच्या पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच, जिल्हा रुग्णालयासाठी साडेचारशेहून अधिक, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठीची सत्तरहून अधिक औषधांच्या पुरवठ्याचे आदेश कधी दिले जाणार, याचे कोडे कायम आहे.

स्वाइन फ्लू औषधांची उसनवारी
पुण्यापाठोपाठ स्वाइन फ्लूच्या थैमानासाठी संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात औषधांची उसनवारी चालली आहे. यंत्रणेच्या माहितीनुसार लातूरहून चाळीस हजारांपर्यंत गोळ्या आणि ठाण्याहून एक हजारपर्यंत औषधांच्या बाटल्या मागण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाला एक कोटी 36 लाखांची औषधे उपलब्ध झाल्याचा आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे एक कोटींची औषधे शिल्लक असल्याचा दावा केला जात असला, तरीही लातूर आणि ठाण्याहून औषधे मागवण्याची वेळ का आली, याचे उत्तर शोधून सापडत नाही. त्याचवेळी सध्याची गरज आणि त्याअनुषंगाने आवश्‍यक असलेल्या औषधांविषयी यंत्रणा बोलायला तयार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य विभागास प्राप्त निधीचा खर्च दहा टक्‍क्‍यांवरून 15 आणि आवश्‍यकतेनुसार 15 वरून 20 टक्‍क्‍यांपर्यंत स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या महिन्यात जिल्हा स्तरावरून खरेदीचे आदेश आरोग्य विभागाने यंत्रणांना दिले आहेत. आरोग्यविषयक धोरणांची होत चाललेली फरफट पाहता, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतसह खरेदीसाठी निधी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स महामंडळाकडे वर्ग करण्याचा आग्रह का धरला गेला याचे कोडे आजाराने त्रस्त असलेल्यांपुढे कायम आहे.

औषधे की उपकरणे?
आरोग्य विभागाची यंत्रणा सध्याच्या बिघडलेल्या आरोग्याच्या घडीच्या पार्श्‍वभूमीवर गंभीर आहे काय, इतकी कठीण परिस्थिती तयार झाली आहे. डेंगी, स्वाइन फ्लूचा उद्रेक झालेला असताना यंत्रणेला उपकरणे खरेदीचा मोह सुटत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने ग्रामीण- उपजिल्हा रुग्णालयांसाठी मंजूर 80 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पी तरतुदीतून 40 लाखांच्या उपकरणे खरेदीचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांना पाठवला आहे. हा प्रस्ताव 26 सप्टेंबरला दाखल झाला आहे. तसेच, आरोग्य उपसंचालक कार्यालयाने एक ऑक्‍टोबरला नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव, नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीचा प्रस्ताव सात दिवसांच्या आत पाठवण्यास सांगितले आहे. अशीच परिस्थिती राज्यभर उद्‌भवल्यास रुग्णांनी जायचे कुठे, याचा जाब कधी तरी विचारला जाणार की नाही, हा प्रश्‍न गुलदस्तात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com