सरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या 

सरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या 

जळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 13) रात्री जामनेर येथे घडली. पत्नीचा मृतदेह तिच्या मूळ बेलखेडे (ता. भुसावळ) या गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार करण्याचाही त्याचा प्रयत्न होता. मात्र, माहेरच्या मंडळीने शंका उपस्थित केली असता शवविच्छेदनानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन संशयित पतीस अटक करण्यात आली आहे. 

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर येथील सुपारीबागेच्या मागील बाजूस डॉ. भगत लालसिंग पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी ऍड. विद्या राजपूत या जळगाव न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत होत्या. जामनेरहून जळगावी रोज अपडाऊन करून त्या नोकरी आणि कुटुंब सांभाळत होत्या. रविवारी (ता. 13) रात्री साडेदहाच्या सुमारास कौटुंबिक वादानंतर रात्री त्यांचा मृत्यू झाला. डॉ. भगत पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी परस्पर अंत्यसंस्काराची तयारी केली होती. विद्या यांच्या माहेरी पहाटे फोन करून करून मृत्यूची खबर देण्यात आली. कारण विचारल्यावर कधी शॉक लागल्याचे, तर कधी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याचे सांगण्यात येत होते. 

संशय आल्याने शवविच्छेदन 
माहेरच्या मंडळींनी या प्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवत विद्याला मारून टाकल्याचा आरोप करून शवविच्छेदनाची मागणी केली. तेथून मृतदेह वरणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणला. प्रकरण गंभीर असल्याने इन- कॅमेरा शवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज दुपारी तीनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन आटोपल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर संशयित डॉक्‍टर भगत पाटील याला पोलिसांनी तेव्हाच ताब्यात घेत वरणगावला नेले. 

डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ 
ऍड. विद्या यांना पूर्वेश आणि सोनू अशी दोन मुले असून, एक बारा वर्षांचा तर मोठा मुलगा चौदा वर्षांचा आहे. डॉ. पाटील हा स्वतः गावातील एका तरुणीच्या संपर्कात होता. नंतर तिचे लग्न झाल्यावर त्या मुलीच्या लहान बहिणीसोबत त्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. नोकरी सांभाळून विद्या कुटुंब आणि मुलांचा सांभाळ करायच्या. मुळात संशयी वृत्ती असलेल्या डॉक्‍टरकडून विद्या यांना पूर्वीपासूनच त्रास होता. गेल्याच आठवड्यात त्याने पैशांसाठी तगादा लावल्यावर ऍड. विद्या यांनी 58 हजार रुपये त्याला दिले होते. पतीच्या विक्षिप्तपणाचा नेहमीचाच त्रास होता. मात्र, मुलं मोठी झाल्यावर व्यवस्थित होईल, या अपेक्षेने सर्व सहन केले जात होते. पतीचा छळ मारहाण विकोपाला जाऊन अखेर रविवारी विद्या यांना प्राणास मुकावे लागल्याचे नातेवाइकांनी माहिती देताना सांगितले. 

शवविच्छेदन अहवालातील तथ्य 
ऍड. विद्या यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. देवरे, स्त्रीरोग तज्ज्ञ अशा डॉक्‍टरांच्या समितीने शवविच्छेदन करून प्राथमिक अहवाल दिला. त्यानुसार विद्या यांच्या नाकाला ओरखडे होते. चेहरा निळसर काळवंडला होता, तर शरीरावरही किरकोळ जखमा आढळून आल्या. नाक-तोंड दाबून गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com