कर्तव्य भावनेतूनच शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या - आ. डॉ. राहुल आहेर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

कर्तव्य भावनेतूनच शासनाने जेष्ठ नागरिकांना विविध सेवा-सवलती देणाऱ्या अनेक योजना सुरु केल्या आहेत, असे प्रतिपादन देवळा व चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काल रविवार (ता. 8) ला येथे केले.

सटाणा - जेष्ठ नागरिक हा समाजाचा एक अविभाज्य घटक असून त्यांनी स्वत:च्या कुटुंबासह समाज - जीवनाला समृद्ध करण्यासाठी आयुष्यभर कष्ट सोसलेले असतात. म्हणून वृद्धापकाळातील प्रतिकूल परिस्थितीत त्यांना हात देऊन त्यांचे जीवन सुसह्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच शासनाने जेष्ठ नागरिकांना विविध सेवा-सवलती देणाऱ्या अनेक योजना सुरु केल्या आहेत, असे प्रतिपादन देवळा व चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी काल रविवार (ता. 8) ला येथे केले.

येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात श्री यशवंतराव महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक व नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रादेशिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ.आहेर बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सुरेश बागड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, निर्यातदार उद्योजक वर्धमान लुंकड, सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सतीश कलंत्री, स्वागताध्यक्ष जिभाऊ सोनवणे आदी उपस्थित होते.

आमदार डॉ. आहेर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक समस्या लक्षात घेऊन विधिमंडळात सर्वपक्षीय पातळीवर सामंजस्याने भूमिका घेतली जात असून राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षे करण्याचा सरकारचा विचार आहे. विभक्त कुटूबंपद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून एकत्रित कुटूंबप्रणाली हद्दपार होणे हे त्यामागील एक कारण आहे. मात्र संस्कार असलेल्या पिढीने आजही ज्येष्ठ नागरिकांना मानसन्मान बहाल केलेला आहे, असेही डॉ. आहेर यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष सुरेश बागड म्हणाले, अनेक ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नसते. त्यांना या योजनांची माहिती देण्याबरोबरच त्याचा लाभ मिळवून देणे आणि विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या म्हातारपणातील जीवन सुसह्य करण्याचे काम जेष्ठ नागरिक संघातर्फे केले जाते. शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोमर्यादा घटविण्याची मागणीही श्री.बागड यांनी केली.

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या 'यशवंत' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशास ज्येष्ठ नागरिक संघाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय चौधरी, ग्रामीण अध्यक्ष अनंत घोलप, सचिव केदूपंत भालेराव, बाबुलाल मोरे, एन. व्ही. राणे, बाबुलाल नेरकर, केशव सोनवणे, भास्कर सोनवणे, वि. रा. पंडित, राजेंद्र बंब, विश्वनाथ येवला आदींसह नाशिक व नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: the government started various schemes for senior citizens