वर्षभरापूर्वी राज्‍यपालांनी गाव घेतले दत्तक; पण तरीही भगदरी गावाची वाट बिकट  

वर्षभरापूर्वी राज्‍यपालांनी गाव घेतले दत्तक; पण तरीही भगदरी गावाची वाट बिकट  

 तळोदा : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावात एक वर्षात ना इंग्रजी माध्यमाची शाळा आली ना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरू झाला. मोबाईल टॉवर उभा राहिला मात्र कनेक्टिव्हिटी आली नाही, माती बांधनाले असो की जलयुक्तचे बांध असो, पाणी त्यात साठले नाही. तर १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत केंद्रही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यपालांनी दत्तक घेतल्याला गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना एक वर्षानंतरही विशेष प्रगतीची प्रतीक्षाच आहे. 


नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास आपण सर्व मिळून करू, अशी नवी उमेद देणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या मोलगी भगदरी दौऱ्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने ‘सकाळ’ने या एक वर्षात नेमकी काय परिस्थिती बदलली याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अजूनही अनेक बाबी करायच्‍या बाकी आहेत, असे दिसून आले. 


राज्यपाल कोश्‍यारी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा २० व २१ फेब्रुवारी २०२० ला झाला होता. या दौऱ्यात राज्यपालांनी मोलगी व भगदरी येथे भेट देऊन तेथील नागरिकांचे जगणे जाणून घेतले होते. या वेळी मोलगी येथे भगर प्रोसेसिंग युनिटला भेट देऊन भगरची टेस्ट घेतली होती. मात्र भगर प्रोसेसिंग युनिटचे पुढे काय झाले हे अजूनही पुढे येऊ शकलेले नाही. मातीकाम बंधारा व अंगणवाडी केंद्र तसेच सांस्कृतिक भवन येथे भेटी देत राज्यपालांनी सातपुड्याच्या संस्कृतीमधील वस्तू व त्यांचे प्रदर्शनही पाहिले होते. बी-बियाण्याची माहिती घेऊन रोजगाराच्या निर्मितीसाठी सातपुड्यातच संधी असल्याचे सांगितले होते. मात्र सातपुड्याच्या माथी स्थलांतराचा शाप अजूनही गेलेला नाही. 

रोजगाराच्या शोधात गावे ओस पडलेली आजही आढळतात. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पाहिजे तसा निधी व योजना सातपुड्यात येत नाहीत, असा अनुभव असल्याने पर्यटन क्षेत्रातील रोजगारनिर्मितीही पुढे सरकू शकलेली नाही. भगदरी येथील पशुसंवर्धन दवाखान्याचे उद्‌घाटन झाले खरे मात्र हा दवाखाना पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही, तर दुसरीकडे नागरिकांसमोरच महापारेषण व महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून १३२ किलोवॉट केंद्राचे काम केव्हा पूर्ण होईल, अशी विचारणा राज्यपालांनी केली होती. त्या वेळी जून २०२० पर्यंत केंद्र सुरू होणार, अशी माहिती दिली होती. मात्र अजूनही ते केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे किमान दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होण्यासाठी विकासाची गती राखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. 

मोलगीला तालुक्याचा दर्जा केव्हा? 
मोलगी या अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या मध्यवर्ती गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची जुनी मागणी आहे. ग्रामस्थांनी राज्यपालांकडे त्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यातच २०१५ मध्येदेखील तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव पिंपळखुटा येथे आले असताना तेव्हादेखील मागणी करण्यात आली होती. मोलगीला तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे तालुक्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com