राज्यपाल बुधवारी आदर्श बारीपाड्याच्या दौऱ्यावर 

Vidyasagar Rao
Vidyasagar Rao

वार्सा : आदिवासीबहुल, स्वयंनिर्भर व आदर्श बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे बुधवारी (ता. 9) राज्यपाल सी. विद्यासागर राव हे दौऱ्यावर असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी दिली. 

विविध विकासकामांच्या पाहणीसाठी राज्यपाल दौऱ्यावर असतील. बारीपाडा ग्रामस्थांनी अकरा एकर क्षेत्रात वन संरक्षण केले आहे. एकीमुळे ते शक्‍य झाले. बारीपाडा ग्रामस्थ आळीपाळीने वन संरक्षण करतात. श्रमदानाच्या माध्यमातून चारशे ते साडेचारशे दगडीबांध, मातीबांध बांधले गेले आहेत. त्यामुळे बारीपाडा येथील भूजल पातळी उंचावली आहे. वनक्षेत्रात विविध प्रकारच्या वनौषधी, सागवान मोठ्या प्रमाणावर आहे. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त आहे. प्रत्येक शौचालयास स्वतंत्र पाण्याची टाकी आहे. 

प्रत्येक घरात धूर विरहित चूल आहे. परिसरातील काडीकचरा, भाताचे तूस आदींच्या वापरातून शेगडीसाठी लागणारे ब्रिकेट तयार करणे, ते जाळण्यासाठी वापरात आणले जातात. गावात अनेकविध उपक्रम सुरू असतात. 1992 पासून वन संरक्षण सुरू करताना कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, वृक्षारोपण, सीसीटी, श्रमदानातून 450 ते 550 लहान मोठे दगडीबांध, 30 ते 35 मातीबांध, पाझर तलाव, लाख उत्पादन, मधुमक्षिका पालन, गुळाचे गुऱ्हाळ, सोलर शेती पंप, सोलर होम लाइट, घरोघरी वृक्षलागवड, परसबाग, वनभाजी स्पर्धा, दारूबंदी, बारीपाड्यात घरोघरी गॅस कनेक्‍शन, कुक्कुटपालन, बचत गट, सुधारित चारसूत्री भातलागवड, बटाटा लागवड, स्ट्रॉबेरी लागवड, गुलाब शेती असे अनेक उपक्रम बारीपाड्यात राबविले जातात. या गावावर तीन अभ्यासकांनी पीएच. डी. केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांचा दौरा असून, नियोजनासाठी पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. जे. राठोड, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एस. बांगर, शाखा अभियंता ए. एस. पाटील, भूषण वाघ, पवार, मोतीराम पवार, बाबूराव पवार आदींनी पाहणी केली. हेलिपॅडबाबत चर्चा केली. 

माहिती फलक तर लावा 
बारीपाड्याच्या पाहणीसाठी देश- विदेशातून मान्यवर येत असतात. मात्र, त्यांना या गावापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी आणि गावाकडे कुठून प्रवेश करावा या विषयी माहिती, दिशादर्शक फलक लावण्याची साधी तसदी सरकारी यंत्रणेने घेतलेली नाही. त्यात पश्‍चिम पट्ट्यात रस्त्याची अवस्था बिकट आहे. बारीपाड्याकडे कुडाशी- डांगशिरवाडे- मोगरपाड्यवरून एक मार्ग, तसेच वार्सा- मापलगाव- मोगरपाड्यवरून बारिपाडा हा दुसरा मार्ग, तसेच वार्सा- मांजरी- मतकुपीपाडा- बारिपाडा हा तिसरा मार्ग आहे. या ठिकाणी दिशादर्शक, माहिती फलक लावावे, रस्त्याचे काम चांगले करावे, अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com