‘स्वच्छ भारत मिशन’कडे ८६ ग्रामसेवकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

साक्री तालुक्‍यातील स्थिती; सात दिवसांत कार्यवाही न केल्यास कारवाई करण्याचा दिला इशारा

धुळे - जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत यावर्षी जिल्ह्याला ५६ हजार शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात साक्री तालुक्‍यातील तब्बल ८६ ग्रामसेवकांनी या अभियानाकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले आहे. या ग्रामसेवकांनी येत्या सात दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी दिला.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत काम न केलेल्या ग्रामसेवकांच्या सुनावणीसाठी आज जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत कामचुकार ग्रामसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. साक्री तालुक्‍यात २०१२ मध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार १५ हजार ३९ वैयक्‍तिक शौचालयांचे उद्दिष्टही देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे यांनी विविध उपक्रम राबवीत जनजागृतीही केली. 

साक्री तालुक्‍यात एकूण १६८ ग्रामपंचायती आहेत. त्यात एकूण उद्दिष्टपूर्तीच्या चार हजार ५६ वैयक्‍तिक शौचालयांचे काम झाले आहे, तर ८६ ग्रामसेवकांनी कामच केले नाही. प्रस्ताव येत नाही, गावातून सहकार्य होत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे नेहमीप्रमाणे ग्रामसेवकांनी दिली. येत्या मार्चअखेर उद्दिष्ट पूर्ततेसाठी ग्रामसेवकांनी कामे करावीत, अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी डॉ. गुंडे यांनी दिली.

चक्‍क प्रस्तावच नाही
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्‍तिक शौचालयांसाठी लाभार्थ्याला बारा हजार रुपये दिले जातात. अनुदानामुळे प्रस्तावाची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. मात्र, बेटावदसारख्या गावात चक्‍क प्रस्तावच दाखल होत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. साक्री तालुक्‍यात आणखी काही गावांमध्ये प्रस्तावच न आल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. याबाबत ग्रामसेवकांनी गांभीर्याने कामे करावीत व अहवाल पाठवावा, अशी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे यांनी केली. यावेळी साक्री तालुक्‍यातील ८१ ग्रामसेवक उपस्थित तर चार ग्रामसेवक अनुपस्थित होते.

Web Title: gramsevak neglet to swatch bharat mission