बिबट्याला ठोसे लगावून आजीने वाचविला नातवाचा जीव

Chetan
Chetan

लखमापूर - बिबट्याच्या जबड्यात घट्ट पकडलेला नातू मृत्यूचा दाढेत असतानाही एका आजीने हिंमत न हरता बिबट्याशी झुंज देत त्याला पिटाळून लावले व आपल्या नातवाचा जीव वाचविला. बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याला सहीसलामत सोडवत नातवाला आजीने अक्षरशः पुनर्जन्मच दिला. आजीच्या जोरदार ठोशांमुळे बिबट्याला जीव वाचविण्यासाठी धूम ठोकावी लागली. गुरुवारी (ता. २) दिवसभर या थरारक घटनेची पिंपळगाव केतकीच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती. 

पिंपळगाव केतकी येथील तीन वर्षांचा चिमुकला चेतन शेतातील घराबाहेर खेळत असताना पहिल्यांदा बिबट्याचा बछडा तेथे आला. ते मांजर असावे असा अंदाज बांधून चेतन त्याच्याकडे जाताच अवघ्या काही क्षणात त्याच्या पाठीमागून बिबट्याची स्वारी बाहेर आली आणि त्याने चेतनची मांडी पकडली. समोरच हजर असलेल्या आजी अलका गायकवाड यांनी वेगाने बिबट्यावर झडप घेत त्याची मान पकडली. आजींनी मुष्टियोद्याच्या स्टाइलमध्ये बिबट्याच्या डोक्‍यावर आणि पोटावर ठोसे लगावण्यास सुरवात केली. नेमके या वेळी बाजूलाच असलेल्या पुंजा गायकवाड यांनी आजी व बिबट्याची लढाई पाहताच आरडओरड सुरू केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्काळ गायकवाड आजींकडे धाव घेतली. धावत येणारे शेतकरी पाहताच बिबट्याने चेतनची मांडी सोडून उसाच्या शेतात पळ काढला. जखमी अवस्थेतील चेतनला शेतकऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्या पायाला खोलवर जखमा असल्याने त्याला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. गुरुवारी दिवसभर आजीच्या धाडसाचीच चर्चा गावभर सुरू होती.

पंधरा दिवसांपूर्वीच बिबट्या जेरबंद
अवघ्या १५ दिवसांपूर्वी याच गावातून बिबट्या जेरबंद केला असताना, गुरुवारी पुन्हा नवीन बिबट्या आल्याने पिंपळगाव केतकीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com