VIDEO : नुकसानभरपाईचा एक रुपया मिळाला नाही..पैसा गेला कुठं? संतप्त शेतक-यांचा महाजनांना सवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत द्राक्ष उत्पादकांची बैठक झाली. यावेळी शेतक-यांच्या नावे असलेले नुकसान भरपाईचे पैसे गेले कुठे? असे विचारत द्राक्ष बागायतदारांनी सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावर पालकमंत्र्यांनी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत द्राक्ष उत्पादकांची बैठक झाली. यावेळी शेतक-यांच्या नावे असलेले नुकसान भरपाईचे पैसे गेले कुठे? असे विचारत द्राक्ष बागायतदारांनी सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावर येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढला जाईल. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल.असे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले.

 

शेतकरी द्विधा मनस्थितीत..
गेल्या महिन्यापासून अवकाळी पाऊस सुरु झाला असून जिल्ह्याच्या सर्व भागात रोज किमान दहा मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. काही ठिकाणी हे प्रमाण ५० ते ६० मिलीमीटरपर्यंत पोचले. त्यामुळे बागा फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या ठिकाणी घड जिरले. फुलोऱ्यातील बागातील घड कुजले. मण्यांमध्ये पाणी भरलेल्या बागेतील मणी तडकले आहेत. जुलै व ऑगस्टमध्ये छाटण्या झालेल्या बागलाण, मालेगावमधील द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले. यावेळी संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी पालकमंत्र्यांना नाशिक विभागातील अवकाळी पावसाच्या नुकसानीबद्दलचे निवेदन दिले. द्राक्ष उत्पादक शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. तसेच मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सरकारने तत्काळ भरघोस मदत जाहीर करावी, अशी मागणी बोराडे यांनी केली.

ते म्हणाले, की  चांदवड परिसरात सप्टेंबर व ऑक्‍टोंबरमध्ये छाटण्या झालेल्या बागांचे ८० टक्के, तर दिंडोरी तालुक्‍यात ९५ टक्के छाटण्या झाल्या असून सप्टेंबरमधील छाटण्यांच्या बागांचे ७०टक्के आणि निफाड तालुक्‍यातील शंभर टक्के छाटण्या झालेल्या बागांचे ७० टक्के नुकसान झाले. नाशिक व सिन्नरमध्ये ९९ आणि १०० टक्के नुकसान झाले आहे. अशा साऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी. असे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, खासदार डॉ. भारती पवार, माजी आमदार अनिल कदम, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grape growers raised questions about the government's negligence to Girish Mahajan