करंजवन-मनमाड जलवाहिनीसाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

CM
CM

मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या आत कामाचा शुभारंभ होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपययोजना म्हणून शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार व त्यांचे पती भाजप नेते रत्नाकर पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महाजन यांच्या दालनात बैठक होऊन सदर पाणीपुरवठा योजनेबाबत अडचणी समजावून घेतल्या, सर्वात मोठी अडचण नगर पालिकेने १५ टक्के रक्कम (४५ कोटी) स्व:हिस्सा लोकवर्गणी भरणे गरजेचे असते, मात्र पालिकेची बिकट परिस्थिती पाहता सदर रक्कम भरणे शक्य नसल्याने त्याबाबत ठोस निर्णय व्हावा यासाठी काल (ता. १२) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण राज्यमंत्री  विजय शिवतारे, खासदार डॉ भारती पवार, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार, आमदार पंकज भुजबळ, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक प्रवीण शिरसाठ,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते. 

या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सर्वेक्षण व तांत्रिक छाननी करून प्रारूप प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या योजनेची अंदाजे किंमत २९७ कोटी एवढी असून या योजनेसाठी लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून नगरपालिकेने ४५ कोटींपैकी दहा कोटींची तरतूद केली आहे या बैठकीत योजनेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्था, पाणी मोजमाप मिटर व भविष्यातील सदर योजनेची देखभाल व दुरुस्तीची क्षमता नगरपालीकेची असली पाहिजे. तसेच उत्तम रित्या योजनेची देखभाल व दुरुस्ती झाली पाहिजे व सदर पाणीपुरवठा योजनेचे काम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे हे स्पष्ट आदेश दिले प्रामुख्याने सदर बैठकीत नगर पालीकेला भरावयाचा १५ टक्के हिस्सा भरण्याबाबत चर्चा झाली नगरपालीकेची आर्थिक परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांनी सदर रक्कम टप्या-टप्प्यने भरण्याचे संबंधीत यंत्रणेस आदेश देत या योजनेला तत्वतः मंजुरी दिली आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक  आचारसंहितेच्या आत या कामाचा शुभारंभ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

तसेच सीएसआर फंड कशा पध्दतीने मिळेल याबाबत शहरात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, गॅस प्लँट आदी  कंपन्यासोबत चर्चा करावयास सुचित केले आहे तर स्वतः पालकमंत्री महाजन या योजनेला सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र चव्हाण तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे त्यामुळे सदर जलवाहिनी पाणीपुरवठा योजना पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मनमाडसह नांदगाव शहराचा पाणीप्रश्न कसा सोडवता येईल या बाबत दोन्ही शहराची पाणीपुरवठा योजनेबाबत व्यवहर्ता तपासणेबाबत महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे अधिकारी, मुख्य अभियंता श्री लांडगे यांना स्पष्ट आदेश देण्यात आले व तात्काळा तशा प्रकारची व्यवहार्ता तपासून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. 

मनमाड शहराचा गंभीर पाणीप्रश्ना सोडण्यासाठी नियोजित करंजवण योजना व्हावी यासाठी बैठकीची मागणी तसेच सदर योजना मंजूर व्हावी या करिता जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार कसे आग्रही होते हे स्वतः पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत आगामी होणाऱ्या विधानसभेच्या 'उमेदवार' आणि उमेदवारीचे जणू संकेतच दिले. 

करंजवन योजना मंजूर झाल्याने सर्वांच्याच प्रयत्नांना फळ आले  करंजवन योजनेचे पहिले निवेदन देणारे, भीमराव बिडगर, जनहित याचिका दाखल करून मनमाडच्या पाणीप्रश्नावर आणि करंजवन योजनेवर सतत पाठपुरावा करणारे मनमाड बचाव कृती समितीचे अशोक परदेशी व त्यांचे सर्व सहकारी, जनहित याचिका दाखल करणारे एड सागर कासार, प्रत्यक्षात जाऊन आराखडा तयार करणारे जीवन प्राधिकरणचे अभियंता नंदकिशोर लोगांने, पाच दिवस आमरण उपोषणास बसलेले भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, कैलास शिंदे, महेंद्र गरुड, दादा बंब, पोपट बेदमुथा, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, उपनगराध्य राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, पालिका अधीकारी, आमदार पंकज भुजबळ, निवेदन देत सर्व्हेची मागणी करणारे भाजपचे शहराध्यक्ष जय फुलवनी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, करंजवन योजनेबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवणारे कामगार नेते अनिल निरभवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,  तीन दिवस आमरण उपोषण करणारे मनोज गांगुर्डे, सतिष न्हायदे, अमित बाकलीवाल डॉ अमोल गुजराथी, डॉ सुहास जाधव आणि विशेष म्हणजे योजनेला खऱ्या अर्थाने चालना देणारे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार व त्यांचे पती जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजप नेते रत्नाकर पवार, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाई, सर्वच पक्ष, मनमाडकर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, विविध राजकिय पक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, बंद उपोषण, निवेदने, धरणे करत करंजवन योजना लावून धरली होती. 

करंजवन योजनेचे निवेदन दिल्यापासून तर ती मंजुरीपर्यंत शासकीय स्थरावर योजना लावून धरत मनमाडचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची पहिल्यापासून सकारात्मक भूमिका होती सर्वप्रथम सर्व्हेचे आदेश दिले त्यांनतर  मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून योजना मंजूरी बाबत घेतलेला पुढाकार मनमाडकरांना नक्कीच भावला आहे पालिका निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही एकही नगरसेवक निवडून आला नाही मात्र तरीही मुख्यमंत्र्यांनी अथवा पालकमंत्र्यांनी कोणतीही कटुता न धरता मनमाडकरांसाठी जीवनदायीनी असलेल्या करंजवन योजनेला चालना दिली मनमाडने खासदार डॉ भारती पवारांना लोकसभेत दिलेले मताधिक्य हेही जमेची बाजू असली तरी विधानसभेत मनमाडकर कोणाच्या पारड्यात मत टाकेल हे येणारा काळच ठरवेल.

मनमाडचा पाणीप्रश्न पाहता  भुजबळांनी पाणीटंचाई क्षमविण्यासाठी बरेच प्रयत्न केले निधी दिला आज जे पाणी मिळत आहे तेही त्यांच्यामुळे असले तरी शाश्वत पाणी दिले नाही मनमाडचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा  त्यासाठी त्यांचे प्रयत्न तोकडे दिसले भुजबळांनी ठरवले असते तर करंजवन अथवा इतर कोणतीही शाश्वत पाणी योजना त्यांना देता आली असती कारण स्वतः छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते पंकज भुजबळ आमदार होते आणि आहेत त्यांना हे शक्य होते मात्र तसे केले नाही ज्या आशेने मनमाडकरांनी भुजबळांना जवळ केले त्याच आशेचे निराशेत रूपांतर झाल्याने भुजबळांना विधानसभेसाठी बरीच धावपळ करावी लागली तर नगर पालिकेत सत्ता राखता आली नाही 'भुजबळांनी मनमाडचा पाणीप्रश्न सोडविला नाही तर मी भुजबळ हे नाव लावणार नाही' ही 'भुजबळगर्जना' आज विरतांना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com