पालकमंत्री ‘वेशी’वर, नवीन कुणाच्या ‘राशी’वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

जळगाव - जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, तब्बल वीस दिवसांनंतरही त्यांनी जळगावचा पालकमंत्री म्हणून काम सुरू केलेले नाही. अद्यापही ते पालकमंत्रिपद स्वीकारण्याच्या ‘वेशी’वरच आहेत. दोन मंत्र्यांचा असलेला हा जिल्हा नवीन ‘पाहुणा’ पालकत्वाच्या प्रतीक्षेत असून, ते कुणाच्या ‘राशी’वर येणार, याचीच उत्सुकता आहे.

 

जळगाव - जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, तब्बल वीस दिवसांनंतरही त्यांनी जळगावचा पालकमंत्री म्हणून काम सुरू केलेले नाही. अद्यापही ते पालकमंत्रिपद स्वीकारण्याच्या ‘वेशी’वरच आहेत. दोन मंत्र्यांचा असलेला हा जिल्हा नवीन ‘पाहुणा’ पालकत्वाच्या प्रतीक्षेत असून, ते कुणाच्या ‘राशी’वर येणार, याचीच उत्सुकता आहे.

 

राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे. तर आता गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद आहे. मात्र दोन मंत्री असतानाही त्यांना पालकत्व देण्यात मुख्यमंत्र्यांनाच अडचणी आहेत.जिल्ह्यात खडसे आणि गिरीश महाजन यांच्या अंतर्गत वाद आहे.अगोदरच पक्षांतर्गत वादात मंत्रिपद गेल्याने खडसे नाराज आहेत. त्यात आणखी महाजन यांना पालकमंत्रिपद देवून आणखी नाराजी ओढवून न घेण्यासाठी पक्षाने त्यांना पालकत्व देण्यास सध्या तरी नकार दिला आहे. तर सहकार राज्यमंत्री पाटील हे शिवसेनेचे आहेत. त्यांना पालकमंत्रिपद दिल्यास भाजपच्या खच्चीकरण होऊन शिवसेना वाढण्याची शक्‍यता आहे, ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला हा धोका पत्करावयाचा नाही. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत विचार करण्यात आला नाही. 

महाजन आणि खडसे यांच्या समन्वय घडविण्याचा विचार लक्षात घेऊन पक्षाने बुलडाण्याचे पांडुरंग फुंडकर यांना पालकमंत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला.अद्यापही त्यांनी जळगावात अधिकृतपणे पालकमंत्रिपदाची बैठक घेतलेली नाही. ‘पद’ घ्यायचे की नाही याच ‘वेशी’वर ते आहेत. फुंडकर हे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे आणि फुंडकर यांचे सख्य आहे, त्यामुळे खडसेंच्या जागेवर पालकमंत्रिपद स्विकारण्यापेक्षा त्यांनाच मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याकडेच मंत्रिपद द्यावे असे त्यांचे मत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुक्ताईनगरातील खडसे यांच्या सत्कार कार्यक्रमास ते हजर होते, परंतु जळगावात मात्र ते आले नाहीत.

फुंडकर पालकमंत्रिपद स्वीकारत नसल्यामुळे आता  या पदाचा सध्या तरी प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांच्याकडेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असल्याने ते जळगावचे मंत्रिपद स्वीकारणार काय याबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे आता नवीन ‘पाहुणा’ पालकमंत्रिपद कुणाची वर्णी लावायची याबाबत भाजपमध्येच प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री फुंडकर यांनाच गळ घातली जाणार की नवीन कुणाच्या ‘राशी’वर ते येणार याबाबत आता जळगावकरांची प्रतीक्षा आहे, तो पर्यंत नियोजन समितीचे नियोजन मात्र बैठकीविना अधांतरीच राहणार आहे.

Web Title: Guardian 'on vesi, whose new "rasi on