esakal | नवापूरला गुटखा ट्रक पकडला, नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

truck

नवापूरला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरतहून मालेगावला अवैधरित्या जाणारा विमल गुटखा पकडला.

नवापूरला गुटखा ट्रक पकडला, नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

sakal_logo
By
विनायक सुर्यवंशी

नवापूर : नवापूरला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरतहून मालेगावला अवैधरित्या जाणारा विमल गुटखा पकडला. एक लाख चाळीस हजाराचा विमल पानमसाला गुटख्यासह इतर पाच लाख ६९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. ही कारवाई नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नवापूर हद्दीत केली. ट्रक व मुद्देमाल नवापूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. यावेळी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सुरतहून मालेगाव येथे विमल गुटख्याची तस्करी ट्रक मधून करण्यात येत असल्याची माहिती नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नवापूर शहरालगत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ सुरत कडून मालेगावकडे जाणारा ट्रँक (क्रमांक एम.एच.०४ इफ जे ५२८८ ) या ट्रकला थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये इतर सामानाच्या आत विमल पान मसाला गुटख्याचे पोते आढळून आले. विमल पानमसाला, गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याने हा ट्रॅक नवापूर पोलिस ठाण्यात आणला. ट्रकमध्ये विमल गुटख्याची पोती सोबत प्लास्टिक कचरा पंन्नी, दोरा बंडलचे खोके, ट्रॅव्हल बॅग आदी साहित्य भरलेले होते.
 
विमल पानमसाला गुटखा १ लाख ३९ हजार ९२० रुपये, तीस हजाराच्या ट्रॅव्हल बॅग, चार लाखाची ट्रक असा पाच लाख ६९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालक मोहम्मद रफिक मोहम्मद नासीर (वय ३८ रा.मालेगाव जि.नाशिक) ट्रक मालक तय्यबभाई (रा.सरदार नगर रा.मालेगाव) यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पोलिस शिपाई जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली नंदूरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले, महेद्र नगराळे, शांतीलाल पाटील, जितेंद्र तोरवणे यांनी कारवाई केली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले