Nandurbar Crime News : गुटखा, पानमसाला तस्करांवर कारवाई; तिघांविरोधात शहादा पोलिसांत गुन्हा | Gutkha worth about four lakh 22 thousand 240 rupees was seized in nandurbar crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar Crime News : गुटखा, पानमसाला तस्करांवर कारवाई; तिघांविरोधात शहादा पोलिसांत गुन्हा

Nandurbar Crime News : गुटखा, पानमसाला तस्करांवर कारवाई; तिघांविरोधात शहादा पोलिसांत गुन्हा

Nandurbar News : राज्यात वाहतूक व विक्री प्रतिबंध असलेला गुटखा व विविध प्रकारच्या सुगंधित पानमसाला तस्करांवर शनिवारी (ता. २०) शहरात पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दोन ठिकाणी कारवाई करत सुमारे चार लाख २२ हजार २४० रुपयांचा गुटखा जप्त केला असून, या प्रकरणी तिघांविरोधात शहादा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. (Gutkha worth about four lakh 22 thousand 240 rupees was seized in nandurbar crime news)

गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा, सुगंधित पानमसाला वाहतूक विक्रीला राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. असे असले तरी मध्य प्रदेश व गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी सुरू असून, सर्रासपणे शहरात थोड्या थोड्या अंतरावर गुटख्याची विक्री होत आहे.

पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी दुपारी शहादा दोंडाईचा रस्त्यावर कल्याणी डेअरीसमोर विमल गुटख्याची वाहतूक करणाऱ्या योगेश गुलाब भोई व प्रकाश गुलाब भोई यांच्या ताब्यातून विक्री करीत असलेला सुमारे ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

दुसरी कारवाई शहरातील मेमन कॉलनी परिसरात एका गुदामावर केली असून, तेथून सुमारे तीन लाख २० हजार ६३ रुपयांचा गुटखा व इतर विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला जप्त केला आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत पोलिस नाईक किरण पावरा, पोलिस शिपाई किरण जिरे माळी शासकीय वाहनाने शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक बुधवंत यांना गुप्त माहिती मिळल्यावरून त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहितीची खात्री करून तपासणी करायला सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या वेळी त्या ठिकाणी मुद्देमाल सापडला. दोन कारवायांत सुमारे तीन लाख ९२ हजार ३०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. पोलिस शिपाई भरत उगले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत संशयित तौसिफ रफीक मेमन (वय २८, रा. मेमन कॉलनी, शहादा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत व जितेंद्र पाटील तपास करीत आहेत.

तस्करांमध्ये घबराट

शहादा पोलिसांनी अचानक गुटखा व तत्सम सुगंधी तंबाखू तस्करांवर कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर गुटखा तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक तस्कर शहरातून फरारी झाल्याची चर्चा आहे.

अनेकांनी त्यांच्या ताब्यातील गुटखा शहराबाहेर सुरक्षित स्थळी हलविल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी केवळ नाममात्र म्हणून गुटखा तस्करांवर कारवाई न करता यामागील मास्टर माइंड प्रमुख सूत्रधाराला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :Nandurbarcrime