Motivational : उंची अडीच फूटच..पण 'याची' लढाई आभाळाएवढी ! 

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 19 November 2019

नाशिकजवळील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील डोंगरपाडा (आताचे सोमनाथनगर) येथील मोहन बेंडकुळे या युवकाची उंची आहे, फक्त अडीच फूट...गावाला जाण्यासाठी ना धड रस्ता, ना पिण्यासाठी पाणी. गावात शाळा नाही. मोहन लहान असताना शाळेसाठी तो दहा किलोमीटर चालून देवरगाव येथे जात असे. कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावी नापास झाल्यावर त्याने शिक्षणाला कायमचा गुडबाय केला. घरची परिस्थिती बेताची होती. काम करणे आता त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. पाच वर्षे शिरोळ्यातील दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात विनोदी कलाकार म्हणून तो काम करू लागला. विविध मराठी गाण्यांवरील त्याचा डान्स बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले. 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर काढला. अगदी पाडा ते मंत्रालय अशी त्याने लढत दिली. ईश्‍वराने अनेक कलागुण त्याला भरभरून दिले आहेत. तमाशा फड, विनोद, नृत्य तो अतिशय सुरेख करतो. इतक्‍या लहान उंचीचा मोहन ग्रामपंचायत सदस्य बनला. आता पाड्यावर त्याला पिण्याचे पाणी पोचवायचे आहे. 

डोंगरपाड्याच्या दोन घोट पाण्यासाठी मंत्रालय दणाणून सोडले

"मेरा नाम जोकर' चित्रपटात जोकर अर्थात, बुटक्‍या व्यक्तीची सत्य परिस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न राज कपूर यांनी केला होता. "जीना यहॉं मरना यहॉं...' असे म्हणत स्वतःची दुःखं लपवत समाजाला हसते ठेवणारा जोकर सर्वांनी बघितला होता. बुटके असणे केवळ विनोदाचा एक विषय बनतो, पण हा बुटकादेखील एक माणूस आहे. त्यालादेखील सुख-दुःख आहेत, हे आपण व समाज विसरतो. पण हेच बुटके ज्या वेळी आभाळाएवढे काम करतात त्या वेळी समाजालादेखील त्याची दखल घ्यावीच लागते. 

Image may contain: 7 people, people smiling, people standing

घरकुलातील भ्रष्टाचाराचा तमाशा आणला चव्हाट्यावर 

नाशिकजवळील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील डोंगरपाडा (आताचे सोमनाथनगर) येथील मोहन बेंडकुळे या युवकाची उंची आहे, फक्त अडीच फूट...गावाला जाण्यासाठी ना धड रस्ता, ना पिण्यासाठी पाणी. गावात शाळा नाही. मोहन लहान असताना शाळेसाठी तो दहा किलोमीटर चालून देवरगाव येथे जात असे. कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावी नापास झाल्यावर त्याने शिक्षणाला कायमचा गुडबाय केला. घरची परिस्थिती बेताची होती. काम करणे आता त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. पाच वर्षे शिरोळ्यातील दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात विनोदी कलाकार म्हणून तो काम करू लागला. विविध मराठी गाण्यांवरील त्याचा डान्स बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करू लागले. 

चहाच्या कंपनीला फायदा 
नाशिकचा मोहन महाराष्ट्रात नावारूपास येऊ लागला. एका बाजूला लोकांची करमणूक करणारा मोहन दुसऱ्या बाजूने खूप दुःखी होता. गावात दुष्काळ असल्याने आई-वडिलांची काळजी होती. तो कष्टाची कमाई गावाकडे पाठवत होता. अगदी तीन-तीन वर्षे तो घरी जात नसे. इतकी मेहनत करूनही दोन वेळेचे पोट भरत नव्हते. मग त्याने नाइलाजास्तव हा फड सोडून विक्रम चहा कंपनीत कामाला लागला. विविध बाजारपेठांत, आठवडे बाजारात जाऊन विविध वेशभूषा करून चहाची जाहिरात तो करू लागला. यामुळे चहाचा खप वाढू लागला. यामुळे कंपनीने त्याला बढती देत मार्केटिंगमध्ये घेतले. प्रचंड मेहनत, परिश्रम करून आज कुठे तो थोडा फार स्थिरावला आहे. 

Image may contain: 4 people, people standing and child

समजूतदार पत्नी 
मोहनचे 2004 मध्ये शीतलबरोबर लग्न झाले. पत्नी खूप समजूतदार मिळाली. तिची उंची पाच फूट, पण तिला मोहनवर खूप गर्व आहे. या दोघांना दोन मुले व मुलगी आहे. दोघांचा संसार अतिशय सुखात आहे. 

कुडाची घरे दाखवून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार 
पाड्याच्या विकासासाठी मोहन झटतोय. गावात अशिक्षित ग्रामस्थांची होणारी फसवणूक त्याला सहन होत नाही. गावात इंदिरा आवास घरकुल योजनेद्वारे गोरगरिबांना पक्की घरे दिली जातात. या गावातील 15 ते 20 आदिवासींच्या कुडाची घरे पक्की दाखवून त्या ग्रामस्थांच्या फसवणुकीचा प्रश्‍न मोहनने लावून धरला. अगदी ग्रामपंचायत ते मंत्रालय दणाणून सोडले. याचा परिणाम होऊन भ्रष्टाचार उघडकीस आला. आज हजार वस्तीच्या या गावाला पिण्यासाठी पाणी नाही, की विहीरदेखील नाही. पाण्याच्या टाकीसाठी मोहन गेल्या पंधरा वर्षांपासून लढतोय. गावातील महिला तब्बल आठ-दहा किलोमीटरवरून पाणी आणतात. एप्रिल- मे महिन्यात तर गाव पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी झगडते. पाण्याच्या टाकीसाठी तो झटतोय. गावदेखील त्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. एक बुटका म्हणून हिणवणाऱ्या समाजाला मोहनने आपल्यातील कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखविले. 

Image may contain: 3 people, people smiling

मोहनच्या नावाचे फड 
आज तमाशाचा फड सोडून अनेक वर्षं जरी लोटली असली तरी "मोहन नाशिककर' नावाचा फड अजूनदेखील जोमात चालू आहे. प्रेक्षक अजून त्याला विसरलेले नाहीत. त्याची अदाकारी खूपच दिलखेचक होती. नृत्य त्याचा आत्मा होता. कोणत्याही गाण्यावरील त्याचा ठेका बघण्याजोगा असे. गावात मारुती मंदिर, मरीआई आणि वेताळ ही मंदिरे आहेत. गावात शाळा नसून चारही बाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. व्यायामशाळा, वाचनालय नाही. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रोजगारासाठी गावातील माणसे नाशिक येथे रोजंदारीसाठी येतात. गावात बसगाडी येत नाही. पाच किलोमीटर पायी जाऊन दुसऱ्या गावातील शाळेत मुले जातात. गावात भजनी मंडळ असून, पूर्वी अनेक पहिलवान गावात होऊन गेले. 

कोणत्याही सरकारी याजनेचा लाभ नाही
दिव्यांग असूनही कोणत्याही सरकारी याजनेचा लाभ मिळाला नाही. खरेतर या योजना गरजूंपर्यंत पोचतच नाहीत. शहरात केवळ देखावा केला जातो. कलेलादेखील पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही. संगणकाच्या युगात मुले व त्यांचे पालक बाहेर पडायला तयार नाहीत. मुलांना जुनी परंपरा, नृत्य माहीत होत नाही. केवळ मॉल संस्कृतीत रमणारी ही मुले भविष्यात भरपूर पैसे कमावतील, पण त्यांना समाधान मिळणार नाही. - मोहन बेंडकुळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half-footed Mohan Bendkule has struggled for the development of the monastery Nashik News,