मालेगावमधील अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे व खोक्‍यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे सरदार चौकाने प्रथमच मोकळा श्‍वास घेतला.

मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे व खोक्‍यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे सरदार चौकाने प्रथमच मोकळा श्‍वास घेतला.
गूळ बाजार परिसरातील अतिक्रमण हटवावे, रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा, अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे व सहकारी अनेक वर्षे करीत होते. "सकाळ'ने या संदर्भात गेल्या महिन्यात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. अतिक्रमण व चौकातील वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झाले होते. अन्य नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या. अखेर मंगळवारी पोलिस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण निर्मूलन पथक तेथे धडकले. सकाळी अकरा ते दुपारी तीनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागप्रमुख राजू खैरनार, प्रभाग अधिकारी किशोर गिडगे, अतिक्रमण अधीक्षक दीपक हातगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या 20 कर्मचाऱ्यांनी दोन वाहनांच्या मदतीने ही मोहीम पार पाडली.
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागाने या परिसरात नवीन अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केल्या. गूळ बाजार परिसरात किराणा, भाजीपाला मालाची मोठी बाजारपेठ आहे. त्यातच याच चौकात प्रसिद्ध जामा मशीद व प्रकाश तालीम संघाचे गणेश मंदिर आहे. येथे सातत्याने गर्दी असते. येथील अतिक्रमण हटवावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या भागातील रहिवासी चौकात पाऊलही टाकू शकत नव्हते. यामुळे तक्रारी वाढल्या होत्या.
पोटनिवडणुकीनंतर अतिक्रमण हटाव
शहरात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागते. शाळा, मंदिर, संवेदनशील क्षेत्रही अतिक्रमणापासून सुटले नाही. महापौर रशीद शेख स्वत: दोन वर्षे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात आग्रही आहेत. अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी शहरातील विविध शाळांतील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रस्त्यावर येत मोर्चा काढला. मोर्चाला सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांनी पाठिंबा दर्शविला होता. मात्र, विविध सण-उत्सव, राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नव्हता. आता आयुक्त व अपर पोलिस अधीक्षकांनी यात विशेष लक्ष घातले आहे. 23 जूनची पोटनिवडणूक झाल्यानंतर शहरातील सर्व विभागांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hammer on the encroachment of Malegaon