सटाण्यात श्रीकृष्णनगरच्या नोकरदार महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

  • सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा नाही
  • ​मार्च, एप्रिल महिन्यात सलग 40 दिवस नळांना पाणीच नाही
  • सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा संतप्त इशारा

सटाणा : शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. केळझर (ता. बागलाण) येथील धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडून देखील सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील श्रीकृष्णनगर या नववसाहतीतील संतप्त नोकरदार महिलांनी आज गुरुवार (ता. 16) ला भर दुपारी 12 वाजता 40 अंश सेल्सियस तापमानात पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना घेराव घातला. वर्षभरातील सहा महिने नळांना पाणीच येत नसतांना पालिका प्रशासन नागरिकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करीत असल्याचा आरोप करीत असून येत्या चार दिवसात सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर पाणीपट्टी व घरपट्टी कर परत घेण्यासाठी पालिका प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्याचा संतप्त इशारा महिलांनी दिला आहे. 

सटाणा शहरात गेल्या जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत आहे. टप्प्याटप्प्याने पुनंद व चणकापुर धरणातून आवर्तन सोडल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात काही अंशी टंचाईवर मात करता आली होती. मार्च, एप्रिल महिन्यात सलग 40 दिवस नळांना पाणीच न आल्याने निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई आजही जैसे थेच आहे. गेल्या महिनाभरापासुन सार्वजनिक नळांना थेंबभर पाणी नसल्याने जिल्हाधिकारी सूरज पांढरे यांनी ता. 8 मे केळझर येथील गोपाळसागर धरणातून आरमनदीपात्रात आवर्तन सोडले. त्यामुळे शहरालगत असलेल्या आरमनदीपात्रातील पालिकेच्या उद्भव विहिरींचा उद्भव चार्ज झाला आणि शहरात पाणीपुरवठा सुरू झाला. आरमनदीपात्र वाहत असतांना देखील पालिका प्रशासनाने शहरात तीन दिवसाआड पााणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र शहरातील अनेक भागातील नळांना अद्यापही पाण्याचा थेंबही आलेला नाही. यामुळे शहरवासीय संतप्त झाले आहेत. 

शहराच्या एका टोकाला असलेल्या नववसाहतीतील श्रीकृष्णनगर परिसरात गेल्या 15 वर्षापासून पाणीटंचाईची समस्या आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग वास्तव्यास असल्याने सकाळी लवकर घराबाहेर पडणारे नागरिक सायंकाळी उशिरा परत येत असल्याने या पाणीटंचाईबाबत पाठपुरावा करण्यासही त्यांना अडचणी येतात. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना 800 ते 900 रुपये मोजून टॅंकरद्वारे पाणी विकत घेतात. मात्र सध्या पाण्याचा थेंबही नसल्याने संतप्त झालेल्या सर्व नोकरदार महिलांनी आज पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. भर दुपारी कडक उन्हात डोक्यावर हंडा घेऊन महिलांनी नववसाहतीपासून साठ फुटी रस्त्यामार्गे काढलेल्या मोर्चाने इतर शहरवासीयांचे लक्ष वेधले.

दरम्यान, रस्त्यातच पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक राहुल पाटील यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ मोर्चेकरी महिलांची समजूत काढून त्याच ठिकाणीच पालिका अधिकाऱ्यांना पाचारण करून प्रश्न सोडविण्याची विनंती केली. मात्र संतप्त महिलांनी नकार देत थेट पालिका मुख्यालय गाठले आणि मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या दालनात ठिय्या देत घेराव घातला. यावेळी संतप्त महिलांनी गेल्या पंधरा वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र असंतोष व्यक्त करून आता तरी सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. प्रभागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांनी पाणीप्रश्नाबाबत कोणतीही दखल न घेतल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुख्याधिकारी डगळे यांनी येत्या काही दिवसात या परिसरातील जलवाहिनीच्या वॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येईल तसेच श्रीकृष्ण नगरपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी इतर परिसरात वीज भारनियमन करून उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. मोर्चात माधुरी जाधव, शकुंतला साबळे, संगीता अहिरे, वंदना खैरणार, विजया देवरे, प्रमिला कापडणीस, शकुंतला देवरे, विमलबाई मराठे, जयाबाई येवला, प्रदीप भामरे, अमोल पगारे, अरूण मराठे, पुंडलिक कापडणीस, रमेश सोनवणे, महेंद्र कापडणीस के.बी.अहीरे, दिपक जाधव, अशोक खैरणार, प्रकाश ह्याळीज, माणीक बोरसे आदीसह परिसरातील रहिवासी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handa Morcha in Shrikrishna Nagar Satana of Employer women wing