अपयश पचवले, यश पचविणे अवघड

अपयश पचवले, यश पचविणे अवघड

नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जळगाव जिल्ह्यात झालेल्या "मिनी मंत्रालय' अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात श्रेय-अपश्रेयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. खडसेंचा जिल्हा अशी ओळख म्हणून त्यांचा प्रभाव मानायचा, मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी मानली तर महाजनांना श्रेय द्यायचे, की या दोन्ही नेत्यांनी विशेष लक्षच घातले नाही हे गृहीत धरून जिल्हाध्यक्ष नात्याने उदय वाघ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवायची? राज्यात व केंद्रात इतकी वर्षे पराभव पचवून संघर्ष करत आता कुठे सत्तेची फळे चाखणाऱ्या भाजपच्या धुरिणांना गेल्या काही दिवसांत मिळू लागलेले यश मात्र पचविता येत नाही का? हाच खरा प्रश्‍न आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन महिन्यांत चार महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या. पैकी विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक भाजपने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी जिंकली. त्यानंतरच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने भुसावळसारख्या प्रतिष्ठेच्या नगरपालिकेसह सात नगरपालिकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. नगराध्यक्षपद मिळविताना पक्षाचे नगरसेवकही मोठ्या संख्येने निवडून आले. आणि आता गेल्याच आठवड्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या पदरात 33 जागांचे दान टाकून या पक्षाला बहुमताच्या उंबरठ्यावर आणून सोडले. अर्थात गेल्या तीन टर्मपासून जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती, मात्र ती शिवसेनेसोबतच्या युतीच्या माध्यमातून. त्यामुळे यावेळी मिळालेले यश भाजपसाठी एका अर्थाने निर्भेळच म्हणावे लागेल.
यशाचे श्रेय घ्यायला सर्व तत्पर असतात. पराभवाचे धनी व्हायला कुणी तयार नसतात, हा नेहमीचा अनुभव. आणि तोच आता भाजपमधील दाव्या-प्रतिदाव्यांतून येऊ लागले आहे. नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेत मिळालेले यश भाजपला पचविता येत नसल्याचे दिसून येत आहे. या यशाच्या श्रेय-अपश्रेयावरून पक्षनेत्यांमध्येच दावे-प्रतिदावे सुरू झाल्यानंतर इतकी वर्षे पराभव पचवत संघर्ष करून सत्तासिंहासनापर्यंत पोहोचणारा हाच तो पक्ष का? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.


वस्तुत: भाजप हा "केडरबेस' पक्ष म्हणून ओळखला जातो. खरेतर जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच साधारणत: दीड महिन्यापूर्वी सरदार पटेल भवनात झालेल्या पक्षाच्या जिल्हा बैठकीत या निवडणुकीसंदर्भात पक्ष पदाधिकाऱ्यांनी तालुका व मंडल स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. निवडणुकीसाठी उमेदवार कोण हे निश्‍चित नसताना त्यावेळी भाजपकडून अगदी तालुका, मंडलच नव्हे तर गट, गण पातळीवर रचना करण्यात आली होती. गट व गणनिहाय प्रमुख नेमले होते. प्रत्येक तालुक्‍यासाठी पालक पदाधिकारी नियुक्त करून पालक नेते म्हणून त्या-त्या आमदार, खासदार व नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. या संपूर्ण रचनेत कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू होता, आणि तोच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत पोहोचणारा पक्षाचा प्रतिनिधीही होता.


स्वाभाविकत: या निवडणुकीत जर पक्षाने यश मिळविले असेल, तर त्यातील प्रमुख घटक म्हणून काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही. कार्यकर्ता कधीही यशाचा दावा करीत नाही, नेते भाषणात वरवर "कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला यश मिळाल्या'ची भाषा वापरत असले तरी ती मनातून येत नाही, हे वास्तव आहे. आणि अलीकडच्या काळात तर भाजपमध्येही यशाचे विश्‍लेषण करताना नेत्यांच्या बोलण्यातून अहंभाव डोकावतो, नव्हे तर प्रत्यक्ष किंवा खासगीत बोलूनही दाखविला जातो. आताही नेमके तेच होतेय. त्यातूनच यशाचा उत्सव साजरा करत असताना त्याला यशाच्या श्रेय-अपश्रेयाच्या वादाची किनारही आहे. चंद्रकांतदादांसारख्या विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ राहिलेल्या कार्यकर्त्याने शनिवारच्या बैठकीत "उतू नका मातू नका...' असा दिलेला सल्ला यानिमित्ताने बोलकाच म्हटला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com