‘हतनूर’चे ३६ गेट उघडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

हतनूर धरण क्षेत्रात ७८.४० मिलिमीटर पाऊस
रावेर - ‘हतनूर’च्या परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. रावेर तालुक्‍यातही तिसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस झाला. यामुळे खरीप पिके तरारली आहेत. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ‘तापी’, ‘पूर्णा’ यांसह उपनद्यांच्या उगम स्थानावर पाऊस होत आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला आहे. यामुळे या मोसमात प्रथमच हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या हतनूर धरणाची जलपातळी २०९.८३० मीटर आहे. जलसाठा १८९.९०, तर धरणातून ९३६ क्‍यूमेक्‍स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात ७८.४० मिलिमीटर पाऊस झाला, तर रावेर तालुक्‍यात आज १६.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर २१०.८६ मिलिमीटर, असा ३० टक्के पाऊस रावेर तालुक्‍यात झाला आहे.

जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून मॉन्सून जिल्ह्यात रुळला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण पावसाच्या सरासरीच्या ३५ टक्के पाऊस झाला आहे. आज सायंकाळी सातला व रात्री दहाला हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आल्याने जलविसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. धरणातून ९३६ क्‍यूमेक्‍स एवढे पाणी सोडले जात आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. समाधानकारक पावसामुळे पिकांची वाढ जोमात होत आहे. आता अनेक ठिकाणी पावसाची उसंत मिळताच पिकांना खते देतानाचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या गुरुवारपर्यंत पाऊसच नव्हता. मात्र, गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुुरू झाला. कोठे कमी, तर कोठे अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणचे नद्या- नाले वाहू लागले आहेत. धरणांतील साठ्यातही वाढ होत आहे. यामुळे पावसाबाबत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, एकूण सरासरीच्या केवळ ३५ टक्‍केच पाऊस झाल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्याशिवाय कोरडे असलेले प्रकल्प व अनेक प्रकल्पांत अद्याप पाणीसाठा झालेला नाही. 

दरम्यान, झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. आता शिल्लक असलेल्या वीस टक्के पेरण्याही पूर्ण होतील. हा पाऊस पिकांच्या वाढीस योग्य असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatnur Dam 36 Gate Open Water Release Rain