आरोग्य विभागाला सापडेना ‘गचाळ’वीर

युनूस शेख
मंगळवार, 8 मे 2018

जुने नाशिक - शहरात हागणदारीमुक्तीचे तीन तेरा वाजले असताना, पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून केलेल्या महिनाभराच्या कारवाईत उघड्यावर अस्वच्छता करणारी एकही व्यक्ती आढळली नाही, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक अस्वच्छता करणारे पावलोपावली आढळतात. मग अशा व्यक्तीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जातो, की सारेकाही विभागाच्या कृपाशीर्वादाने चालते, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे ‘अशा व्यक्ती दाखवा आणि बक्षीस मिळवा’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

शहरात उघड्यावर शौचास बसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे यांसारखे प्रकार केले जात असतात. पूर्व विभागात अनेक ठिकाणी आजही उघड्यावर शौचास बसतात. सर्वत्र स्वच्छतेची ऐशीतैशी झाली आहे.

महापालिकेचे ‘गुडमॉर्निग’ पथकही केवळ नावालाच राहिले आहे. पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाने एप्रिलमध्ये उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी केवळ एकावर कारवाई करत १५० रुपये दंड वसूल केला. उघड्यावर शौचास बसणे, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याची मात्र एकही कारवाई करण्यात आलेली नाही. एकूण महिनाभराचा आढावा घेतला असता, याबाबतची कारवाई शून्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पूर्व विभागात सकाळच्या सुमारास अनेक जण उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे यांचा खरेच शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ‘एक ढुँढो हजार मिलेंगे’ अशी परिस्थिती आहे. महापालिका कारवाईत मात्र याउलट माहिती समोर येणे म्हणजे आश्‍चर्याची बाब आहे.

उघड्यावर शौचाची ठिकाणे
 गंजमाळ रस्त्याच्या कडेला
 भीमवाडी झोपडपट्टी
 अमरधाम रोड
 टाळकुटेश्‍वर नदीपात्र
 डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासमोर
 विनयनगर परिसर
 भारतनगरलगत नदीपात्र
 टाकळी नदीपात्र

Web Title: health department toilet