राज्यभरातील आरोग्य सेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नाशिक - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 18 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन करत असल्याने आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे आणि आरोग्य सेवेसंदर्भातील ऑनलाइन सेवाही ठप्प झाल्याने जिल्हा रुग्णालयांचा आरोग्य विभागाशी असलेला संपर्कच तुटला आहे. आरोग्यमंत्र्यांबरोबरील बैठक निष्फळ झाल्यानंतर अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी (ता. 21) पुन्हा मंत्रालयात बैठक होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून राज्यात 18 हजार कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवेशी निगडित काम करताहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात आल्याने केंद्राच्या राज्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयकच्या योजनांची माहिती आणि त्यांची अंमलबजावणीची माहिती; तसेच त्यासंदर्भातील अहवाल सातत्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडे देण्याचे काम या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची सारी भिस्त याच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे. गेल्या चार दिवसांपासून 18 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी व 60 हजार आशा कर्मचाऱ्यांनी "समान काम-समान वेतन' या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

आपत्कालीन सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची आणि समान वेतनाची हमी हवी आहे. अत्यंत तुटपुंज्या वेतनावर कर्मचारी दहा वर्षांपासून काम करीत असताना शासन अचानक त्यांच्या नोकरीवर गदा आणू पाहात आहे.
- विजय सोनोने, राज्य सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना

Web Title: health service stop health contract employee agitation