वादळी वाऱ्याने मुख्य मनोऱ्यांसह 210 विजेचे खांब उन्मळून पडले

yeola
yeola

येवला : मान्सूनपूर्व वादळी पावसाने आज तालुक्याला मोठा हादरा देत अनेक ठिकाणी मोठे नुकसान केले आहे. पूर्व भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने विजेचे चार मनोऱ्यांसह 210 विजेचे खांब व शेकडो झाडे उन्मळून पडले.यामुळे शहरासह विविध भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तसेच डोंगरगावला झाड अंगावर पडून दोन जनावरे ठार झाले असून ममदापूरसह अनेक ठिकाणी घराचे, शेडचे पत्रे उडाले. विजेच्या कडकडाटासह सर्वत्र कमी-अधिक पाऊस झाला.

दिवसभरातील प्रचंड उष्म्याने आज घाम काढला होता. दुपारनंतर वातावरण अधिक ढगाळ झाले सोबतच वादळाचे आगमन झाले. सायंकाळी पाचच्या दरम्यान पूर्व भागात वादळासह पावसाने हजेरी लावली.कुठे दहा मिनिटे तर कुठे अर्धा तास हा पाऊस पडत होता. रात्री सात वाजेनंतर येवला शहरासह जळगाव नेऊर भागातही पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी साचले होते. पावसाचे प्रमाण कमी पण यासोबत असलेल्या वाऱ्याने पूर्व भागातील गवंडगाव, अंदरसुल, बोकटे भागातील विजेच्या चार मनोऱ्यांसह 210 विजेचे खांब जमीनदोस्त झाले.यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.रात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी सायंकाळी चारनंतर आगमन होत पाऊस कमी अन वारा अधिक असे दृश्य होते.शहरातील सब स्टेशनवरील 33 के.व्ही. वीज उपकेंद्र,भारम येथील वीज उपकेंद्रावरील वीजपुरवठा विजेचे खांब पडल्याने बंद होता.लघुदाब वाहिनीचे सुमारे 150 तर मुख्य वीज वाहिनीचे 60 खांब पडल्याची माहिती सहाययक अभियंता राजेश पाटील यांनी दिली

डोंगरगाव येथे आज सायंकाळी 5 ते 6.30 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात अनेक वृक्ष उन्मळून पडले. तर काही पत्र्याच्या घरांचे छताचे पत्रे उडाले.येथे झाड अंगावर पडल्याने कचरू सोमवंशी यांचा बैल मृत्युमुखी पडला.तर अशोक सोमवंशी यांच्या गाईच्या अंगावर झाड पडल्याने गाय मृत्युमुखी पडली. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सोमासे,सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय सोमासे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.ममदापुर येथे वादळ वार्यासह चाळीस ते पंचेचाळीस मिनीट पाऊस झाला.वारा जोराचा असल्याने परिसरातील बरेच झाडे उसळून पडले तर दवाखान्याच्या आवारात झाड पडले. शेतातील पत्रे तसेच येथील शाळेतील पत्रे देखील उडाले व ते झाडांना अडकले.विजतारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

ममदापुर, सायगाव, देवळाने,खामगाव,भारम,राजापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे अर्धा तास वादळी पाऊस झाला. शहरातही वीज पुरवठा काही भागांमध्ये खंडित होता.अनेक ठिकाणी झाडे,घरावरील पत्रे,विजेचे खांब,जाहिरातींचे फलक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com