ढगफुटीत वाहून गेली वाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

जुने भामपूर (ता. शिरपूर) येथे सोमवारी (ता. २४) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीत पांढरीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे खळवाडी अक्षरशः वाहून गेली. यात तीन बैल व दोन म्हशी बुडून मृत्युमुखी पडल्या. 

शिरपूर (जि. धुळे) - जुने भामपूर (ता. शिरपूर) येथे सोमवारी (ता. २४) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीत पांढरीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे खळवाडी अक्षरशः वाहून गेली. यात तीन बैल व दोन म्हशी बुडून मृत्युमुखी पडल्या. 

खळवाडीतील अनेक शेतकऱ्यांचे गोठे, चारा, खते, शेतीपयोगी अवजारे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन पेरणीच्या तोंडावर पशुधन व अवजारे नाहीशी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी खचले आहेत. गेल्या ४० वर्षांत प्रथमच असा पूर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जुने भामपूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर पांढरीच्या नाल्याखाली जुनी मोरी आहे. उखळवाडी व मुखेड या दोन लघु प्रकल्पांतून बाहेर आलेले दोन नाले गावापासून काही अंतरावर एकत्र येतात.

काल मध्यरात्री अडीचला या परिसरात ढगफुटी होऊन नाल्यात पाण्याचा लोंढा आला. पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काठावरील खळवाडीत पूर आला. पुराचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी खळवाडीकडे धाव घेतली. मात्र, पुराचे पाणी दगडी मोरीवरून वाहत असल्याने पशुधनाच्या बचावासाठी संधीच मिळाली नाही.

अथक संघर्षातून बचावला बैल
जुने भामपूर गावातील मोतीलाल दोधा पाटील यांचा बैल काल रात्री घराच्या मागील गोठ्यात बांधला होता. पाण्याच्या लोंढ्यासोबत तो वाहून गेला. पुराचे पाणी, गाळ, अंधार अशा वातावरणात अथक संघर्ष करीत त्याने पहाटे स्वतःची सुटका करून घेतली. बैलाला जिवंत पाहून मोतीलाल पाटील यांना अश्रू अनावर झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy Rain Farmer Loss