सुरगाण्यात विक्रमी पाऊस; पुरात गेला एक वाहून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिक - सुरगाण्यात शनिवारी (ता. 4) यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस झाला. अवघ्या साडेचार तासांत तब्बल 134 मिलिमीटर पाऊस झाला, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत 141 मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, शनिवारी झालेल्या पावसाने आपल्या पुरात खुंटविहीर (मोहपाडा) येथील मोतीराम सखाराम धूम (वय 45) पुरात वाहून गेले. जिल्ह्यात सुरगाण्यासह चांदवड, दिंडोरी व देवळा तालुक्‍यांत पाऊस झाला. 

जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांना पावसाची आस लागून राहिली आहे. पण शनिवारी मात्र सुरगाणा तालुक्‍यावर पाऊस मेहेरबान होता. दिवसभरात सुरगाण्यात जणू लहानशी ढगफुटी अनुभवास आली. सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या साडेचार तासांत तब्बल 134 मिलिमीटर पाऊस झाला. भेगू, धोंडावे, कोसवन परिसराचा केंद्रबिंदू राहिलेल्या या पावसामुळे त्या भागातील नाले, ओहोळांना प्रचंड पूर आला. या पुरातून रस्ता ओलांडताना अनेकांना अडचणी आल्या. मोहपाडा येथील खुंटविहीर भागातील मोतीराम धूम रस्ता ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. प्रशासनाने त्वरित शोधकार्य मोहीम राबविली. त्यांचा मृतदेह शोधण्यात दुपारी यश आले. 

साडेचार तासांत 134 मिलिमीटर पाऊस 
यंदाच्या मोसमात सुरगाणा तालुक्‍यातील शनिवारी दुपारी साडेचार तासांत पडलेला 134 मिलिमीटर पाऊस विक्रमी ठरला. त्याशिवाय दिंडोरीत 24, देवळा 21, चांदवडला 13 मिलिमीटर पाऊस झाला. इतर तालुक्‍यांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. सुरगाणा तालुक्‍यातील आजच्या मुसळधार पावसाचा बराचसा भाग चणकापूर धरणक्षेत्रातील गावाचा परिसर असल्याने हे सगळे पाणी चणकापूर धरणात जाऊन तेथील साठा वाढणार आहे. आजच्या एका दिवसाच्या पावसामुळे चणकापूर धरणाचा साधारण पाच टक्‍क्‍यांपर्यत साठा वाढण्याची आशा आहे.

Web Title: heavy rain in nashik district