चंद्राच्या सहाय्याने अल्पदरात वीजनिर्मितीचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नाशिक : अवकाशातील वसाहतीसंदर्भात भरपूर संशोधनकार्य सुरू आहे. चंद्रातील घटकांच्या सहाय्याने सद्यःस्थितीत उपलब्ध होत असलेल्या विजेपेक्षाही स्वस्त दरात वीजनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती "ब्राह्मोस'चे माजी सीईओ डॉ. ए. सिवाथनू पिल्लई यांनी दिली. नवनवीन शोध ही निरंतर प्रक्रिया असून, ते जीवन सुखकर करण्यास मदत करतात. त्यामुळे युवकांनी संशोधनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. 

नाशिक : अवकाशातील वसाहतीसंदर्भात भरपूर संशोधनकार्य सुरू आहे. चंद्रातील घटकांच्या सहाय्याने सद्यःस्थितीत उपलब्ध होत असलेल्या विजेपेक्षाही स्वस्त दरात वीजनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती "ब्राह्मोस'चे माजी सीईओ डॉ. ए. सिवाथनू पिल्लई यांनी दिली. नवनवीन शोध ही निरंतर प्रक्रिया असून, ते जीवन सुखकर करण्यास मदत करतात. त्यामुळे युवकांनी संशोधनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. 

संदीप विद्यापीठातर्फे आयोजित अभियांत्रिकी, कायदा, तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रांतील उगवते आयाम यावरील आंतरराष्ट्रीय परिषद "आइस मेल्टस-2018'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या तीनदिवसीय परिषदेत नऊ देशांतून सुमारे पाचशेहून अधिक तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठाचे प्रा. डॉ. लेव क्रिस्टोफर, तैवानच्या लुघ्वा विद्यापीठाचे डॉ. हियाओ रुई चांग, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन रामचंद्रन, डॉ. रोसील्डा सेल्व्हिन, प्रा. अरुण द्विवेदी, डॉ. चेतन चौधरी, महाविद्यालयांचे प्राचार्य आदी उपस्थित होते. 

डॉ. पिल्लई म्हणाले, की काळानुरूप संशोधनातून तंत्रज्ञान प्रगत होत आहे. ऊर्जेच्या वाढत्या गरजेसाठी भारतासहित जगातील सात देशांनी काम सुरू केले आहे. त्यानुसार चंद्रावर सापडणाऱ्या हेलियम-3 वर संशोधन सुरू आहे. त्या हेलियमच्या शुद्धीकरणासाठी आगामी वर्षात चंद्रावर एक कारखाना सुरू करण्यात येऊन त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येईल. 

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे येत्या पन्नास वर्षांत सागरी किनाऱ्यावरील अनेक शहरे जलमय होण्याचा धोका आहे. त्यावर पर्याय म्हणून तरंगते शहर कसे निर्माण करता येईल, यावर संशोधन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

अध्यक्षीय भाषणात गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्रात कार्यरत मॅरेथॉन रिऍलिटीचे अध्यक्ष चेतन शहा म्हणाले, की विद्यापीठे ही देशउभारणीत महत्त्वाचे काम करतात. देशाचे भविष्य असलेल्या युवकांना घडविण्याचे कार्य विद्यापीठांत होते. सुधारणा ही एक निरंतर प्रकिया असून, कोणत्याही व्यवसायात सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्‍यकता असते, असेही त्यांनी नमूद केले. 

संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा म्हणाले, की भविष्यात सर्वच क्षेत्रांत अनेक बदल घडणार असून, त्या बदलासाठी सर्वांनी तयार राहावे. ज्यांनी हा बदल ओळखून स्वत:मध्ये बदल केला, त्यांनाच भविष्यात टिकाव धरता येईल. 

दळणवळण क्षेत्रात काम 
करणाऱ्या संस्थेची स्थापना 
डेन्मार्कचे प्राध्यापक रामजी प्रसाद यांच्या पुढाकाराने संदीप विद्यापीठात "सेंटर फॉर टेली इन्फ्रास्ट्रक्‍चर ग्लोबल कॅप्सूल' संस्थेची स्थापना करण्यात आली. दळणवळण क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करणाऱ्या या संस्थेमुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांना दळणवळण क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल.

Web Title: with the help of moon creation of electricity