उच्चविद्याविभूषित तरुण नोकरीसाठी देशसेवेच्या मार्गावर

indian-soldier
indian-soldier

देवळा - सध्या सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने कसमादेपट्ट्यातील बहुतांश तरुण देशप्रेम व करिअर यांचा सुवर्णमध्य साधत सैन्यदलात भरती होणे पसंत करत आहेत. उच्चविद्याविभूषित तरुणही हाती बंदूक घेत सैनिकी प्रशिक्षणात, तर काही प्रत्यक्ष सीमेवर कार्यरत होत आहेत. 

जिल्ह्याचा उत्तर ईशान्य पट्ट्यातील बहुतांश भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे शेतीतून फारसे उत्पन्न निघत नाही. पदव्या असूनही नोकऱ्या मिळत नसल्याने बऱ्याच होतकरू व धाडसी तरुणांनी सरळ सैन्यदलात प्रवेश करत देशसेवेचे व्रत स्वीकारले आहे.

देवळा तालुक्‍यातील खुंटेवाडी, खालप, खर्डे, लोहोणेर, मटाणे, खामखेडा, गिरणारे; बागलाण तालुक्‍यातील निताणे, जायखेडा, डांगसौंदाणे, ठेंगोडा; कळवण तालुक्‍यातील निवाणे, बेज, पाळे, मालेगाव तालुक्‍यातील देवघट, कळवाडी, दाभाडी; चांदवडमधील भयाळे. शिंदे, वडाळीभोई अशा अनेक गावांतून सैन्यात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, डी.एड., बी.एड., बी.एस्सी., एम.ए., डिप्लोमा, डिग्री असे उच्चशिक्षण घेतलेली मुले दररोज व्यायाम करत भरतीत सहभागी होत आहेत.

निवृत्तिवेतनाची सोय
सैन्यात जीडी म्हणजे जनरल ड्यूटी, तंत्रज्ञ व ट्रेंड्‌समन असे प्रमुख तीन प्रकार असून, यातील चांगले शिक्षण असणाऱ्यांना त्या त्या रॅंकमध्ये भरती होता येते. सध्या इतर सर्वच नोकरीत पेन्शन बंद करण्याचे संकेत मिळत असले, तरी सैनिकांना मात्र पेन्शनची सुविधा कायम आहे. याशिवाय सैन्यात भरती होताना कोणतेही आरक्षण आडवे येत नाही. याशिवाय तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था येथे कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून या भागातील सरासरी भरतीचे आकडे काढले तर ते जवळपास याप्रमाणे दिसले. २०१४-१५ : ३५०,  २०१५-१६ : ४००, २०१६-१७ : ३८०, २०१७-१८ : ४००

आमच्या ॲकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत या भागातील जवळपास १४ हजार मुले संरक्षणक्षेत्रात भरती झाले आहेत. भरतीपूर्व प्रशिक्षण दिल्यामुळे मुलांना सैन्यात भरती होणे सुलभ जाते. 
- आनंदा महाले, संचालक, बागलाण ॲकॅडमी, सटाणा

सैन्यदलात भरती होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, धैर्य, चिकाटी, संयम व शिस्त अशी पंचसूत्री स्वीकारणे महत्त्वाचे असते. आपल्या देशासाठी व स्वतःच्या करिअरसाठी युवकांनी सैन्यात जायला हरकत नाही. आपल्या कामगिरीनुसार येथेही पदोन्नती मिळते. 
- बाळासाहेब भामरे, निवृत्त सुभेदार, खुंटेवाडी, ता. देवळा 

माझ्यासह इतर मित्र बी.ई. (मेकॅनिकल) झालेलो असताना आम्ही सैन्यात भरती झालो आहोत. या क्षेत्रात करिअर करून दाखविण्याची चांगली संधी असून, देशसेवा करण्याचे भाग्य मिळत आहे, याचा आनंद वाटतो. 
- सागर खैरनार, वासोळ, ता. देवळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com