कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव...

विजय वाकचौरे : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

विजय वाकचौरे : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : शेतकरी सोशल मीडियावर कांद्याच्या रोपांची मागणी करीत आहेत. तसेच कांद्याच्या रोपांचे छायाचित्र टाकून काही शेतकरी रोपांची विक्री करीत आहेत. अद्याप पावसाच्या पाण्याने तसेच स्वच्छ वातावरणाने साथ दिल्याने शेतकरी कांद्याच्या लागवडीसाठी वाटेल त्या पद्धतीने भांडवल उभे करताना दिसून येत आहे. 

सिन्नर : तालुक्‍याच्या उत्तर-पूर्व भागात यंदा मुबलक पाण्यामुळे शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. कांदा लागवडीत दर वर्षीच्या तुलनेत तीनपटींनी वाढ झाली आहे. महागडे कांद्याचे रोप खरेदी करून शेतकरी लाल कांद्याची लागवड करीत आहेत. चार वर्षांत कडवा कालव्याचे पाणी किर्तांगळी, वडांगळी गावांची वेस ओलांडत नव्हते. यंदा पूर्व भागात दमदार पाऊस झाला. धरणांमधील पूरपाणी कडवा कालव्यात येत आहे. यामुळे पुतळेवाडीपर्यंत सर्वच छोटी-मोठी बंधारे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे.

कांदा रोपांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध

किर्तांगळी, मेंढी, वडांगळी, निमगाव, शिंदेवाडी, पंचाळे, रामपूर, सायाळे, भोकणी, शहा, वावी, भरतपूर, दहीवाडी, उजनी, निऱ्हाळे, पाथरे, वारेगाव, मीरगाव आदी गावांत कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी कांदा रोपांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत. 

सोशल मीडियावर कांदा रोपांना मागणी 
शेतकरी सोशल मीडियावर कांद्याच्या रोपांची मागणी करीत आहेत. तसेच कांद्याच्या रोपांचे छायाचित्र टाकून काही शेतकरी रोपांची विक्री करीत आहेत. अद्याप पावसाच्या पाण्याने तसेच स्वच्छ वातावरणाने साथ दिल्याने शेतकरी कांद्याच्या लागवडीसाठी वाटेल त्या पद्धतीने भांडवल उभे करताना दिसून येत आहे. 

रोपांचा दर 25 ते 30 हजारांवर 
वातावरणातील बदलात कांदा कसा पिकेल? कसा दर मिळेल, याची शाश्‍वती नसताना रोपांसाठी शेतकरी 25 ते 30 हजार रुपये मोजण्यास तयार आहेत. लाल कांद्याच्या रोपांना यंदा सोन्याचा दर मिळत आहे. कांदा रोप तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच भाव मिळत आहे. कांदा लागवडीसाठी शेतकरी खेळत असलेल्या जुगारात शेतकरी कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवेल. 

प्रतिक्रिया 
विविध कारणांनी कांद्याची लागवड गतवर्षी कमी झाली. शेतकऱ्यांकडे आता विक्रीसाठी कांदा शिल्लक राहिलेला नाही. नवीन कांदा लागवड करून अडीच महिन्यांनंतर लाल कांद्याची तेजीत विक्री होईल, या अपेक्षेने शेतकरी लाल कांद्याची लागवडी करीत आहेत. 
-भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: higher prices for onion plants