महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुन्हा मार्गी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

जळगाव - गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ठप्प झालेले महामार्ग चौपदरीकरणातील फागणे- तरसोद टप्प्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पंधरवड्यात सरकार व मक्तेदार एजन्सीमध्ये झालेली चर्चा, आर्थिक तरतूद व नव्या कराराअंती हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. 

जळगाव - गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ठप्प झालेले महामार्ग चौपदरीकरणातील फागणे- तरसोद टप्प्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पंधरवड्यात सरकार व मक्तेदार एजन्सीमध्ये झालेली चर्चा, आर्थिक तरतूद व नव्या कराराअंती हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. 

नवापूर- अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या धुळे ते जळगाव जिल्ह्यातील टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एल ॲण्ड टी कंपनीने काम सोडल्यानंतर तीन-चार वर्षे हे काम रखडले. तीनवेळा निविदा काढल्यानंतर फागणे-तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यात कामाची विभागणी होऊन दोन कंपन्यांना मक्ता सोपविण्यात आला. 

फागणे- तरसोदला ग्रहण
एकीकडे तरसोद-चिखली टप्प्यातील काम वेगाने होत असताना फागणे- तरसोद टप्प्याचे काम आधी सुरू होऊनही थंड बस्त्यात गेले. गेल्या आठ- दहा महिन्यांपासून तर हे काम पूर्णतः बंद पडले. मक्तेदार एजन्सीची आर्थिक अडचण यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी हे काम सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न झालेत. 

अखेर काम सुरू
गेल्या पंधरा-वीस दिवसांत मक्तेदार कंपनीने महामार्ग प्राधिकरणाशी (न्हाई) चर्चा करून आर्थिक तरतुदीबाबत नियोजन केले. आठ-दहा महिन्यांपासून काम बंद पडल्याने नव्याने करार करावा लागणार होता, तोदेखील झाल्याचे सांगण्यात आले. अखेरीस गेल्या दोन-चार दिवसांपासून हे काम पुन्हा सुरू झाल्याचा दावा ‘न्हाई’च्या सूत्रांनी केला आहे. एरंडोल ते पाळधी या टप्प्यात हे काम सुरू झाले आहे. काम मध्यंतरी बंद असले तरी मक्तेदाराचे कामाबाबत आर्थिक नियोजन झाल्याने वर्ष-दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.

शहरातील महामार्गास चालना
गेल्या काही वर्षांपासूनची मागणी, आंदोलन आणि जनभावनांनंतर जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचे कामही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यात पहिल्या टप्प्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची निविदा निघाली असून, दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता पाच मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर हे काम सुरू होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highway Development Work