खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कंटेनरची धडक; दाम्पत्य ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पारोळा ः पारोळा- एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने जळगाव तालुक्‍यातील शिरसोली येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. 

पारोळा ः पारोळा- एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने जळगाव तालुक्‍यातील शिरसोली येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. 
चाळणी झालेल्या महामार्गावरील खड्डे वाहन चालकांसाठी धोक्‍याचा ठरत आहे. महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, यातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील प्रशासनाकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नाही. पारोळा- एरंडोल महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील मधुकर महारू पाटील (वय 45) व त्यांच्या पत्नी प्रतिभाबाई मधुकर पाटील (वय 40) रा. बोराडेमाटकुट ह.मु शिरसोली (जळगाव) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन सोडून पसार झाला. 

खड्ड्यांनी घेतला दाम्पत्याचा बळी 
जळगाव तालुक्‍यातील शिरसोली गावातील रहिवासी असलेले मधुकर पाटील हे त्यांच्या पत्नी प्रतिभाबाई पाटील यांच्यासह दुचाकी (एम.एच.19 सी.एम.9125) ने महामार्गावरून जात होते. जळगावकडून धुळ्याकडे लोखंडी पत्रे घेवून जाणारा कंटेनर (ओ.डी.15 एफ.2751) ने दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्य कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने जागीच मृत झाले. रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास पारोळा- एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरचालक जागीच वाहन सोडून पसार झाला. 

अपघातानंतर पारोळा पोलिसांची धाव 
अपघाताची माहिती कळताच पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे, काशिनाथ पाटील, पंकज राठोड, विनोद माळी, सुनील साळुंखे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवले. 

अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त 
गेल्या आठ दिवसांपूर्वीदेखील महामार्गावरील म्हसवे शिवारात अपघात होवून एकाचा बळी गेला होता. हा अपघात देखील महामार्गावरील खड्ड्यांमुळे झाला होता. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. आज झालेला अपघातदेखील खड्डे चुकविताना झाल्याने दाम्पत्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. जळगाव- एरंडोलदरम्यान महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून अपघात नित्याचे झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही सुस्तच आहे. अपघातानंतर किमान आतातरी दखल घ्यावी, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highway erndol parola bike accident husband wife death