जिल्ह्यातील महामार्गावरील पाचशेवर बार हद्दपारीच्या वाटेवर

- संतोष विंचू
गुरुवार, 26 जानेवारी 2017

३१ मार्चच्या डेडलाईनमुळे पाचशे मीटरवर स्थलांतरासाठी धावपळ

येवला - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेले विदेशी मद्यविक्रेते, वाइन शॉप, परमिट रूम, देशी दारू दुकाने, बिअर शॉपी ३१ मार्चपर्यंत हद्दपार होणार आहे. या हद्दपारीसाठी चालक-मालकांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे पाचशेवर विविध मद्यविक्रेत्यांना नव्या निर्णयाने आपली दुकाने हलवावी लागणार आहेत.

३१ मार्चच्या डेडलाईनमुळे पाचशे मीटरवर स्थलांतरासाठी धावपळ

येवला - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेले विदेशी मद्यविक्रेते, वाइन शॉप, परमिट रूम, देशी दारू दुकाने, बिअर शॉपी ३१ मार्चपर्यंत हद्दपार होणार आहे. या हद्दपारीसाठी चालक-मालकांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे पाचशेवर विविध मद्यविक्रेत्यांना नव्या निर्णयाने आपली दुकाने हलवावी लागणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचे आदेश दिले आहेत. पाचशे मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर परिसरात दारूविक्री करता येणार नाही. यावर सरकारच्या सूचनेने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वच वाइन शॉप, परमिट रूम, देशी दारू विक्रेते, बिअर शॉपी यांना नोटिसा दिल्या आहेत. विक्रेत्यांनी पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच परवाना नूतनीकरण करून घेतला जाईल, असे स्पष्ट करत त्यासाठी ३१ मार्चची डेडलाइन दिली आहे.

अनेक दुकानांना लागणार कुलूप
मुळात जिल्ह्यात ९० टक्के मद्यविक्री ही महामार्गाच्या कडेलाच होत असते. अशा दुकानांचे रस्त्यापासून थेट अंतर मोजले गेल्याने या परवानाधारकांसमोर कुठलाच पर्याय उरलेला नाही. आता तीन महिन्यांत रस्त्यापासून पाचशे मीटरवर सर्व अटी-शर्तींची पूर्तता करून बार, परमिट रूम किंवा वाइन शॉप सुरू करण्याचा पर्याय स्वीकारण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणापासून लांब जाण्याची वेळ आल्याने व्यवसाय टिकेल का ? यामुळे वैतागलेल्या काहींनी तर परवाने विक्रीस काढले आहेत.

जागा शोधण्यासाठी धावपळ
राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून दारूचे दुकान पाचशे मीटर महामार्गावर उभे राहून थेट हवेतून दुकानापर्यंत मोजून या अंतराच्या आत असलेल्यांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटिसा भेटल्याने जिल्ह्यातील विविध महामार्गावरील पाचशेवर विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्याने जागा विकत घेऊन त्यावर बांधकाम करण्याचा पर्याय धनाढ्य बार मालकांनी शोधला आहे. काहींनी तर रेडिमेड इमारतीदेखील विकत घेतल्या आहेत. पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या छोट्या विक्रेत्यांना मात्र परवाना विक्री करावा का? असा सवालदेखील पडत आहेत. 

जिल्ह्यात येथे येईल गंडांतर
मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-जव्हार, नगर-धुळे, विंचूर-प्रकाशा, येवला-नांदगाव, मनमाड-चांदवड, देवळा, नाशिक-मालेगाव, नाशिक-वापी, नाशिक-सापुतारा यांसह जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय मार्गावरील बार, परमिट रूम, बिअर शॉपी, देशी-विदेशी दुकाने यांना फटका बसणार आहे.

Web Title: highway wine shop close