तयारी ‘हिंद केसरी’ची, लक्ष्य ऑलिम्पिक-२०२०

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये मनमोकळ्या गप्पा

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये मनमोकळ्या गप्पा
जळगाव - क्रिकेटची आवड असल्याने एक चांगला गोलंदाज होण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने सरावही सुरू होता. पण कुटुंबात वडील, आजोबा, आईचे वडील कुस्तीगीर असल्याने त्यांच्याशी नाळ जोडली गेल्यामुळेच कुस्ती क्षेत्रात आलो. ‘महाराष्ट्र केसरी’च्या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झालो तेव्हा फक्‍त प्रत्येक डाव जिंकायच्या इराद्याने खेळत राहिलो. माती आणि मॅटवरील स्पर्धेसाठी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे हे फळ होते आणि याच मेहनतीमुळे ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याची हॅटट्रिक साधली. मानेचा त्रास जाणवत असला, तरी आता ‘हिंद केसरी’साठी तयारी सुरू असून २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशासाठी पदक मिळवून देण्याचे लक्ष्य आहे, असे मत ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांनी व्यक्त केले. 

‘सकाळ’च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयात आज (१७ मार्च) ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत संवाद साधताना ते बोलत होते. सुरवातीला खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहाय्यक वृत्तसंपादक अतुल तांदळीकर, शहरातील हॉटेल्स ग्रुपचे संचालक भागवत भंगाळे आदी उपस्थित होते. 

दहावीत मारला पहिला दंड
कुस्तीचा आखाडा गाजविणारे घरात तीन मल्ल असतानाही मला कुस्तीची आवड नव्हती. पण दहावीनंतर अण्णा (वडील) कुस्तीचा सराव सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जायचे. तेव्हा कपडे उतरवून लंगोट बांधत कुस्ती खेळायला उतरायची लाज वाटायची. परंतु कुस्तीचा सराव सुरू असताना माझ्यापेक्षा लहान मुलांना पाहून आपणही कुस्ती खेळू शकतो, हा विचार मनात आला. तेव्हापासून कुस्तीला सुरवात झाली. लहानपणापासून कुस्तीच्या दृष्टीने व्यायामही नव्हता. दहावीत गेल्यानंतर पहिला दंड मारला. त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही.

बहिणीमुळेच शिक्षण
दहावीनंतर कुस्तीला सुरवात झाल्यावर बारावीत पोहोचेपर्यंत एक चांगला मल्ल म्हणून तयार झालो. वडीलच पहिले गुरू होते आणि माझ्यामागे उभी असलेली ताकद यामुळेच मल्ल होऊ शकलो. तरीही बारावीचे शिक्षण झाल्यानंतर मित्र  विज्ञान शाखेला प्रवेश घेताय म्हणून विज्ञान शाखेला जायचे ठरविले होते. पण यावेळी बहीण मनीषा चौधरीने सांगितले, की विज्ञान शाखेला गेला तर कुस्तीचा सराव करता येणार नाही. म्हणून तिच्या सांगण्यावरून बी.ए.ला प्रवेश घेतला आणि भूगोल विषयातून पदवी घेतली. माझे शिक्षण झाले ते खरे म्हणजे बहिणीमुळेच.

‘पहिलवानाचा मुलगा हरला’
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, ही म्हण माझ्याबाबतीत खरी ठरली. कुस्तीचे डावपेच, पकड शिकविणारे पहिले गुरू अण्णा होते. ते जसे खेळवायचे तसा खेळत राहिलो. अकरावीत असताना शालेयस्तरावरील पहिली कुस्ती लढलो आणि ती हरलो. यावेळी गावातीलच लोक पहिलवानाचा मुलगा असून हरलास, असे म्हणायचे. त्याचा खूप राग आला होता. रागात खूप दंड काढल्याने हात दुखायला लागले होते. यामुळे सरावही बंद झाला होता. नंतर मात्र विभागीय, राज्यस्तरावर खेळलो आणि ऑल इंडिया लेव्हलला खेळून ब्राँझपदक पटकाविले.

मॅट कुस्तीसाठी सराव केंद्र हवे
मातीतील कुस्ती आणि मॅटवरील कुस्ती यात फरक असतो. मातीत कुस्ती खेळण्याचा सराव खूप, पण मॅटवरील कुस्तीचे नियम, पंच यात फरक असल्याने ते जुळून यायचे नाहीत. मुळात महाराष्ट्रात मॅटचे केंद्रच नसल्याने कुस्तीगीरही कमी आहेत. पुण्याला गेल्यावर मॅटच्या कुस्तीबाबत अधिक माहिती झाली. कॅम्पमध्ये निवड व्हावी, यासाठी तीनदा जाऊन परत यावे लागले. या ठिकाणी कशीतरी निवड झाली अन्‌ २००८ मध्ये सराव सुरू असताना प्रशिक्षक रोहित पटेल यांनी मला पाहिले. त्यानंतर त्यांनी पंजाबला सरावासाठी पाठविले. मॅट कुस्तीतील सरावात दिल्ली, हरियाना, पंजाब हे महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. पंजाब, चंडीगड येथे अधिक सराव केल्याने त्याचा फायदा अधिक झाला.

कठोर मेहनतीने तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’
गोंदिया येथे २०१२ मध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी झालो. त्यावेळी एक दबाव होता. ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब जिंकायचा हा विचार नाही, तर खेळ जिंकायचा हाच विचार सतत मनात असायचा. पहिल्या दोन कुस्त्या सोप्या असल्याने सहज जिंकलो. परंतु पुढची कुस्ती कोल्हापूरच्या मल्लासोबत होती. त्यामुळे दबाव अधिक वाढला होता. पण योग्य पद्धतीने खेळत राहिलो आणि पॉइंट घेत राहिल्याने कुस्ती जिंकलो. याच बळावर पहिल्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ झालो. तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळेल, हाही विचार नव्हता. प्रशिक्षकांनी सांगितले होते, की समोरच्याला राँग पॉइंट द्यायला प्रवृत्त करायचे तेच अंतिम सामन्यात केले आणि हॅटट्रिक साधू शकलो. 

‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ही खेळणार
ऑलिम्पिकमध्ये खेळून देशासाठी पदक पटकवायचे आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’मध्ये खेळण्याची इच्छा असून, वडिलांशी चर्चा करूनच त्यावर निर्णय घेऊ. जिल्ह्यात मातीतील केवळ कुस्तीच नाही तर कबड्डी, खो-खो या खेळांमध्ये खानदेशात खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करू. कुस्तीसारख्या खेळाचा विकास होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे हव्या तशा सुविधा नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

गोकुळ देतो तेच खातो
गोकुळ साबळे हा जवळचा मित्र, वयाने तसा मोठा. ५० किलो वजनगटात तो अगोदर खेळत होता. परंतु नशिबाने मी पुढे गेलो. यात गोकुळची असलेली साथ कायम राहिली. अगदी उठल्यापासून काय हवे, काय नको हे सारे काही तोच पाहतो. तिन्ही ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धांवेळी तो सोबत होता. स्पर्धेदरम्यान डाएटवर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याने या कालावधीत गोकुळ जे खायला, प्यायला देतो तेच मी घेत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

‘सकाळ’च्या कात्रणांची फाइल
लहानपणापासून घरी ‘सकाळ’ येत आहे. यातील क्रीडा पानावरील सर्व बातम्या वाचून काढायचो. हे करताना त्यावरील खेळाडूंचे विशेषत: क्रिकेटपटूंचे फोटो पाहून येथे आपला फोटो कधी येईल का? हा विचार मनात सतत यायचा. तेव्हापासून वेगवेगळी कात्रणे जमा करत होतो. ज्यावेळी पहिल्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ झालो तेव्हापासून तिसऱ्यांदा किताब पटकावला तोपर्यंत ‘सकाळ’मध्ये आलेल्या फोटोंचे कात्रण कापून त्यांची फाइल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hind kesari preparation by vijay chaudhary