Rate Hike : होळी, रंगपंचमीला महागाईची किनार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Customers buying materials for Holi, Rang Panchami in the city market.

Rate Hike : होळी, रंगपंचमीला महागाईची किनार!

धुळे : होळी, रंगपंचमीचा सण आनंदासह गोड करण्यासाठी हलवायांकडून साखरेच्या गाठींचे हार आणि कंगन तयार केले जात आहे; परंतु या सणाला महागाईची किनार लाभली आहे.

साखरेच्या (Sugar) दरात वाढ झाल्याने यंदा हार, कंगन ८५ ते ९० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहक काहीअंशी नाराज आहेत. (holi festival Due to increase in price of sugar this year Har Kangan is sold at rate of Rs 85 to 90 per kg dhule news)

शहरातील मुस्लिमबहुल भागात साखरेचे हार, कंगन, नारळ, बत्तासे तयार होत आहेत. शहरात सोमवारी (ता. ६) हार, कंगनाला मागणी वाढेल, असे बाबूभाई हलवाई यांनी सांगितले.

होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहराची बाजारपेठ सज्ज झाली आहे. यंदा रंगपंचमीसाठी व्यापाऱ्यांकडून नैसर्गिक रंगांची विक्री होताना दिसत आहे. नैसर्गिक रंगांमुळे त्वचेला कोणतीही हानी पोचत नाही. त्यामुळे नैसर्गिक रंग विक्रीवर भर दिला जात आहे. रंग आणि पिचकाऱ्यांच्या दरात यंदा काहीशी वाढ झाली आहे. या सणानिमित्त निरनिराळ्या साहित्य खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

विविध साहित्य दाखल

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपासून होळी आणि रंगपंचमी साजरी होऊ शकली नाही; परंतु यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या सणासाठी तरुणाईकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. नैसर्गिक रंग विक्रीवर भर दिला जात असल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही, असा प्रयत्न आहे.

साहजिकच नैसर्गिक रंगाला जास्त मागणी आहे. रंग आणि पिचकाऱ्यांच्या दरात यंदा काही प्रमाणात वाढ झाली आहे. आबालवृद्धांकडून रंगपंचमीचा आनंद लुटला जातो. त्यामुळे मुलांना आकर्षित करणारी हर्बल, हर्बल थंडर, स्मोग स्टील, बासरीच्या आकारातील, डोरेमॉनसह अनेक पिचकाऱ्या तसेच कोरडे आणि ओले रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आहेत. शंभर रुपयांपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत रंग उपलब्ध आहेत. तसेच ५० रुपयांपासून ते एक हजारापर्यंत पिचकारी बाजारपेठेत विक्रीस आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

साखरेमुळे गोडी, नाराजी

होलिकोत्सवासाठी साखरेचे हार-कंगन उपलब्ध झाले आहेत. महागाईमुळे बाजारात मंदी आहे. तरीही या सणासाठी मुंबई, पुणे, पालघर, भोईसर, कल्याण, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून साखरेच्या हार-कंगनाला मोठी मागणी असते. सण-उत्सवानिमित्त रोजगार मिळतो. शिवाय संस्कृतीचा परिचय होतो, एकात्मता वाढीस लागते, अशी भावनाही बाबूभाई हलवाई यांनी व्यक्त केली.

चौकाचौकांत मंडप

शहरात रंगपंचमीसाठी सार्वजनिक मंडळांकडून चौकाचौकांत मंडप उभारले जात आहेत. मंडपावर रंगीबेरंगी पताका लावत लक्ष वेधण्यात येत आहे. खंडेराव बाजार मित्रमंडळातर्फे आकर्षक पद्धतीने चौक सुशोभित करण्यात आला आहे.

देवपूर भागात तसेच आग्रा रोड परिसरात मनोहर चित्रपटगृह भागातील अमर मित्रमंडळासह सार्वजनिक मंडळांनी रंगपंचमीच्या तयारीला वेग दिला आहे. पिचकारी-ढोलाचे चिन्ह असलेल्या पताकांनी चौक सजविले जात आहेत. पाण्याच्या टाक्या चौकात ठेवल्या जात आहेत.

काही मंडळांकडून तुषार सिंचन पद्धतीचा वापर करत रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. नेहरूनगरातही उत्तरमुखी मारुती मंडळाकडून चौक सुशोभित केला जात आहे. होळी आणि रंगपंचमीसाठी ढोल-ताशे तसेच डीजेची व्यवस्था करण्यात येत आहे.

पोलिस प्रशासनही तयारीत

होळी आणि रंगपंचमीवेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात शनिवारी संचलन केले. या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिस पथसंचलन करण्यात येत आहे.

सर्वसामान्य जनतेला हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन केले जात आहे.

टॅग्स :HoliDhule