फळबागांना एकरी एक लाख रुपये द्या - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतली.

नाशिक - जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतली. 

भुजबळ यांनी काल (ता. १) येवला (जि. नाशिक) तालुक्‍यातील सायगाव, तळवाडे, महादेववाडी (डोंगरगाव), भारम, खरवंडी, ममदापूर आणि नगरसूल या दुष्काळग्रस्त गावांना प्रातिनिधिक स्वरूपात भेटी दिल्यानंतर प्रशासकीय उदासीनतेबाबत तक्रारी मांडल्या.

दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पाणी, चाऱ्याचा अतिशय गंभीर प्रश्‍न आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करूनही प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांबाबत लक्ष नाही. दुष्काळात टॅंकर देताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व जनावरांची संख्या धरली जाते. आठ वर्षांत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे लोकसंख्येचा विचार करून वाड्या व वस्त्यांवर टॅंकरच्या खेपा दिल्या जाव्यात. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त जनतेला पाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. टॅंकरवर योग्य संनियंत्रण नसल्यामुळे मंजूर असलेल्या खेपांप्रमाणे गावे व वाड्यांमध्ये खेपा टाकल्या जात नाहीत, असे सांगून भुजबळ यांनी तालुकास्तरावर स्वतंत्र कक्षासाठी मागणी केली. चारा छावण्यांचे निकष कठोर आहेत. दहा लाख रुपये अनामत असल्याशिवाय छावण्या सुरू करता येत नाहीत. संस्थांकडे इतके पैसे नसल्याने प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे शासनाने स्वतः छावण्या सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी अधिग्रहित केलेल्या ठिकाणी वारंवार वीज खंडित होत असल्याने टॅंकरच्या खेपा कमी होतात, त्यामुळे येथील एक फीडर सतत सुरू ठेवावा. जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. छावणीतील जनावरांना प्रतिदिन प्रतिजनावर किमान १२० रुपये मोठे व ६० रुपये लहान जनावर याप्रमाणे दर करण्यात यावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horticulture Help Demand Drought Water Shortage Chhagan Bhujbal