बारावीच्या उत्तरपत्रिका गुजरातला दारूच्या ट्रकमध्ये

प्रमोद सावंत
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मालेगाव - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या (एचएससी) उत्तरपत्रिका वाहतुकीची मिळालेली संधी साधून उत्तरपत्रिकांमधून अवैधरीत्या दारू वाहतूक करणारा ट्रक गुजरात पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई श्‍यामळाजी पोलिसांनी गुजरात- राजस्थान सीमेवरील रतनपूर चेक पोस्टवर मंगळवारी केली. पोलिसांनी 13 लाख 51 हजार रुपयांची दारू, दहा लाखांचा ट्रक व 850 थैले (गठ्ठे) उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. ट्रक उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येत होता.

गाजियाबाद (उत्तर प्रदेश) येथून वाशी- मुंबईकडे उत्तरपत्रिका घेऊन येणारा ट्रक रतनपूर नाक्‍यावर पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या अखेरच्या टप्प्यात उत्तरपत्रिका थैल्यांच्या दोन- तीन थप्प्या होत्या. उर्वरित ट्रकमध्ये दारूचे बॉक्‍स भरलेले होते. अरावलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्‍यामळाजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एन. पी. चव्हाण यांनी ही कारवाई केली. ट्रकमध्ये दारूबरोबर प्रश्‍नपत्रिका आढळल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदा विदेशी दारूची विक्री होते. याप्रकरणी ट्रकचालक व क्‍लीनर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघे उत्तर प्रदेशातील आहेत.

Web Title: HSC Answer Paper in Wine Truck Crime Police