कॉप्यांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नाशिक - बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली असून, पहिल्याच इंग्रजी पेपरला कॉप्यांचा पाऊस पडला. हे चित्र त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा या आदिवासी भागासह जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांसह भरारी पथकांच्या हातावर तुरी देत संरक्षक भिंतीवरून उड्या मारून तरुणांनी थेट परीक्षार्थींपर्यंत खिडक्‍यांमधून कॉप्या पुरविल्या. कॉप्या पुरविण्यासाठी मुलांचाही वापर करण्यात आला आहे. कॉपीसाठी प्रतिबंध करणाऱ्या शिक्षकांना तरुणांच्या दादागिरीला सामोरे जावे लागले. खिडक्‍यांबाहेर पडलेला कॉप्यांचा पाऊस पाहता कुठे आहे कॉपीमुक्त अभियान, असा प्रश्‍न उपस्थित होता. 

वणी-सापुतारा मार्गावरील बोरगाव (ता. सुरगाणा) येथील परीक्षा केंद्राच्या पाठीमागील बाजूला कॉपी पुरविणाऱ्यांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कॉपी पुरविणाऱ्यांमध्ये पालक, मित्रांसह नातेवाइकांचा समावेश राहिला. संरक्षक भिंतीवर चढून टवाळखोरांच्या टोळ्या धुडगूस घालत होत्या. फोटोकॉपी दुकाने बंद असतानाही परीक्षा केंद्राबाहेर फोटोकॉपी सहजगत्या उपलब्ध होत होती. खिडक्‍यांना दरवाजे नसल्याने निर्ढावलेल्यांनी थेट खिडक्‍यांमध्ये बसून कॉपी पुरविली आहे. हे कमी काय म्हणून पाणी देण्यासाठी असलेल्या मुलांच्या माध्यमातूनही कॉप्या परीक्षार्थींपर्यंत पोचविण्यात येत होत्या. 

शिटी वाजताच लपविली जायची कॉपी 
त्र्यंबकेश्‍वर/हरसूल ः येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्यामध्ये हरसूल भागातून आलेल्या तरुणांनी रसद पुरविली. उन्हाचा तडाखा असतानाही पालिकेच्या वाहनतळालगतच्या भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरविण्यात तरुणाई व्यस्त होती. परीक्षा केंद्राच्या समोरील भागात पोलिस बंदोबस्त होता. उत्तरेला गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. लहान मुलेसुद्धा संरक्षक भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरविण्याची कामगिरी फत्ते करत होते. कॉपीसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रामुळे ग्रामीण-आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची या केंद्रासाठी पसंती मिळत असल्याचे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकाचा फोटो काढून तो पाठवून पुन्हा उत्तरे मिळविली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्र्यंबकेश्‍वरमधील दोन परीक्षा केंद्रांवर होत असलेली कॉपी रोखण्यात येत नसल्याने त्यात सारेच सहभागी असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. परीक्षा केंद्राच्या परिसरात अनोळखी कुणीही आले की केंद्राबाहेर पहारा देत असलेले कर्मचारी शिटी वाजवून कॉपी लपविण्याचा इशारा करत होते. वातावरण अनुकूल असल्याचे निदर्शनास येताच, दोन वेळा शिटी वाजविली जात होती. 
केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, तर परीक्षा केंद्रात कॉप्याच कॉप्या असल्याने पेपर "बोर्डाचा की कॉपीचा' असा प्रश्‍न तयार झाला. खिडक्‍यांमधून दुसऱ्या मजल्यावर चढून विद्यार्थी सर्रास कॉपी फेकत असल्याचे चित्र दिसत होते. तसेच आवारात काही ठिकाणी कॉप्यांचा खच पडला होता. शिक्षण संकुलातील परीक्षा केंद्रात कॉपी देण्यास वाव नसला, तरीही विद्यार्थी कॉपी पाहून लिहिताना दिसत होते. परीक्षार्थींना कॉपी पाहून लिहिण्याची मुभा देण्यात आल्याचे चित्र आवारात पाहावयास मिळाले. 

Web Title: hsc exam copy