सरकारच्या नोटबंदीमुळे नाशिकला 'लाल चिखल'

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

उन्होने मरहम भी लगाया तो कॉंटेसे !

"सरकारने कोणताही विचार न करता काळा पैसा असा ढोल बडवत नोटांवर बंदी आणली. मात्र आता शेतकऱ्यांपुढे अंधार आहे. कोणीही भाजपचा नेता ग्रामीण भागात येऊन प्रतिक्रिया का व्यक्त करीत नाही. आमचा संताप अनावर झाला आहे.''
- दिलीप थेटे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.
 

नाशिक - मुंबई, गुजरात, नवी दिल्लीसह विविध भागांना उत्तम टोमॅटो पुरविणाऱ्या शेतकऱ्यांवर आज केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे अक्षरशः आभाळ कोसळले. लिलावासाठी आलेले दीड लाख क्रेट टोमॅटो खरेदीस व्यापाऱ्यांकडे फक्त जुन्या नोटाच असल्याने वीस किलोचा क्रेट साठ रुपयांनाही कोणी खरेदी करेना. त्यामुळे तो अक्षरशः फेकून द्यावा लागला. रोज समस्या निर्माण करायची व उपाय शोधायचा या सरकारच्या धरसोड वृत्तीबाबत एका युवकाने "उन्होने गहर जखम दिया... और मरहम भी लगाया तो कॉंटेसे...' अशी वेदनादायी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक शहरालगतच्या भागातून व्यापारी गिरणारे या गावांत विक्रीसाठी येतात. सध्या हंगाम जोमात असल्याने या प्रत्येक ठिकाणी वीस किलोचे एक ते दीड लाख क्रेट विक्रीसाठी येतात. गिरणारे येथे आज सकाळी एक लाख चाळीस हजार क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आला होता. मात्र जिल्हा बॅंकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने व्यापाऱ्यांकडे नव्या नोटा नव्हत्या. बॅंकादेखील शेतकऱ्यांकडून खाते नसल्यास या नोटा स्वीकारत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काहींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. तीन महिने कष्ट करुन पिकवलेल्या, पाच- सहा दिवसांपासून लिलाव बंद असल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीस होते.

शेतकऱ्यांना मजुरांना, शेतीसाठी मालाची खरेदीसाठी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात लिलावच सुरु होईना. जेव्हा लिलाव सुरु झाले तेव्हा वीस किलोच्या क्रेटला सत्तर रुपये तर लहान आकाराचे टोमॅटो कोणीच खरेदी करेना. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यात अनेकांनी टोमॅटो रस्त्यावर व परिसरात फेकून निघून गेले. रुपया किलोचा भाव मिळत होता. मात्र त्याचा वाहतूकीचा खर्चही वसूल होण्याची स्थिती नव्हती. केंद्र शासनाची नोटबंदी टोमॅटो उत्पादकांसाठी मात्र पेटबंदी ठरली आहे. सध्या तरी त्यावर काहीही पर्याय दिसत नसल्याने सगळेच हतबल आहेत.

 

Web Title: huge tomato waste in nashik due to Note ban