विकासाला आयाम देईल शंभरफुटी डांबरी रस्ता

महेंद्र महाजन
मंगळवार, 23 मे 2017

गाव बनले व्हिलेज : चाडेगाव

चाडेगावकरांच्या ठळक अपेक्षा
- दारणा नदीच्या काठाला जॉगिंग ट्रॅक व्हावा
- क्रीडांगणासह उद्याने साकारली जावीत
- घर बांधायचे झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या जागेच्या नोंदीचा उतारा मिळत नसल्याने कर्ज मिळत नाही. ही समस्या दूर व्हावी.
- वीजतारा भूमिगत करण्यात याव्यात

मानकर, नागरे, चकोर, सांगळे, वाघले, शिंदे, पवार, जाधव, वाघ कुटुंबीयांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाडेगावची लोकवस्ती आहे सतराशे. शिवारात 750 हेक्‍टर शेती असून, त्यातील रेल्वे ट्रॅक्‍शनसाठी जमीन देण्यात आली. दारणा नदी असूनही पाइप, मोटार, विजेच्या अभावासह आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा पूर्वी बिगाभर जमिनीत उदरनिर्वाह चालायचा. आता बागायती जमीन करून त्यात मुख्यत्वे ऊस घेतला जातो. सोयाबीन, गहू, भाजीपाला, द्राक्षे, कांद्याचे उत्पादन घेतले जाते. महापालिकेत समाविष्ट झालेल्या शिवारात प्रवेश करताच, या भागाचा खेड्याचा चेहरामोहरा बदलला नसल्याचे चटकन डोळ्यात भरते. येथील विकासाला आयाम द्यायचा झाल्यास सिन्नर फाटा ते चाडेगाव हा रस्ता शंभरफुटी डांबरी व्हायला हवा, असा स्थानिकांचा आग्रह आहे. चाडेगावच्या बदलत्या प्रश्‍नांचा हा धांडोळा...

पेरणीच्या चाड्याचे गाव
चाडेगावमधील सुकदेव कचरू आव्हाड बिगाभर जमीन कसायचे. जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धोत्पादनाकडे लक्ष दिले. डोक्‍यावर एक आणि हातात एक दुधाने भरलेली किटली घेऊन त्यांनी नाशिक रोड भागात जाऊन दूध विकले. अगदी सुरवातीच्या काळात ते पायी जायचे. नंतर सायकलवरून त्यांनी दुधाची विक्री केली. त्या वेळी जेमतेम 500 च्या आसपास लोकवस्ती होती. नोकरी-व्यवसायानिमित्त वीस वर्षांमध्ये लोकसंख्येत भर पडत गेल्याचे ते साक्षीदार आहेत. चाडेगाव असे गावाचे नाव कसे झाले, याबद्दल सांगताना त्यांनी पंचक्रोशीत लागणाऱ्या पेरणीसाठीचे चाडे गावात तयार व्हायचे आणि विकले जात असल्याने त्यावरून चाडेगाव म्हणून गावाची ओळख निर्माण झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, की पूर्वी बाजरी, गहू, हरभरा, ज्वारी, उडीद, मूग, कुळीद अशी पिके घेतली जायची. गावालगत दारणा नदी असूनही तिच्या पाण्याचा वापर होत नव्हता. त्यामुळे शेतीला मोटेने पाणी दिले जायचे. गावामध्ये 1975 मध्ये वीज आली. हळूहळू मोटारी, पाइप आले आणि गावाच्या उत्पन्नात भर पडत गेली. याशिवाय गंगापूर कालव्याचे पाणीही गावातील शेतीला मिळायचे. मात्र, वीस ते बावीस वर्षांपासून पाट बंद झाला. सद्यःस्थितीत दिवसाला अडीच हजार लिटर दुधाचे उत्पादन घेत शेतकरी स्वतः विकतात. आता शेतात पिकवलेला माल शेतकरी सिन्नर फाटा भागातील बाजार समिती उपबाजार आवारात विकतात.
- सुकदेव आव्हाड

ज्येष्ठांचा शिक्षणाबद्दलचा आग्रह
सुकदेवदादांचे बोलणे सुरू असतानाच शेवंताबाई आव्हाड आल्या आणि त्यांनी थेट मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी, अशी सातत्याने मागणी करण्यास सुरवात केली. महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या शिक्षणाची सोय आहे खरी; पण पुढच्या शिक्षणासाठी पोरांना सहा किलोमीटरवर नाशिक रोडला नाही, तर पाच किलोमीटरवरील एकलहरे गावात जावे लागते. चाडेगावमध्ये शिक्षणाची सोय झाल्यास मुलींचाही शिक्षणाकडील कल वाढीस लागेल, असा त्यांचा आग्रह होता. त्या म्हणाल्या, की आमच्या गावची ग्रामपंचायत होती. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यावर शहराप्रमाणे आम्हाला सुविधा मिळतील, असे वाटले; पण आम्हाला शहरात राहतो असे वाटतच नाही. खेड्यात राहण्याचाच आनंद मिळत आहे; पण आमच्याकडून महापालिकेचा शहरासारखा कर घ्यायचा आणि सुविधा द्यायच्या नाहीत, हे योग्य नाही.
- शेवंताबाई आव्हाड

रस्त्यांअभावी शेतीमाल सडतो शेतात
आमच्या मळ्यात रस्ता नाही, अशी खंत मांडत जबाजी बोडके यांनी रस्ते नसल्याने शेतात माल सडत असल्याबद्दलचा संताप व्यक्त केला. उसाची तोड झाल्यावर रस्ता नसल्याने कुणाच्याही वावरातून घुसून ऊस काढावा लागतो. ऊस वावरातून बाहेर काढण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यावर मग मात्र वादात ऊस शेतात अडकून पडतो. शिवारातील तीन रस्ते झाले आहेत; पण अजूनही रानमळा, पासुडी, काराचा माळ, मोठेबाबा रोड या भागांतील मळे रस्ते व्हायला हवेत. खरे म्हणजे, रस्ते वीसफुटी असायला हवेत. प्रत्यक्षात ते पाच ते सात फुटांचे आहेत. म्हणूनच रस्त्यांचा प्रश्‍न कोणत्याही परिस्थितीत युद्धपातळीवर मार्गी लागायला हवा, असेही त्यांनी सांगितले. प्रकाश बोडके यांनी कालवा बुजवण्यात आलेल्या पासुडी भागात रस्ता व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
- जबाजी बोडके

सहा मीटरचा रस्ता
चाडेगावच्या विकासाला वेग देणाऱ्या सिन्नर फाटा ते चाडेगावच्या रस्त्याच्या कामाचा थेट मुद्दा कचरू हुळहुळे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की शासकीय तंत्रनिकेतनमध्ये साडेतीन हजार विद्यार्थी शिकतात. या रस्त्यावरून सायकलवर शाळेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होताच शिंदे, जाखोरी, कोटमगावमार्गे येणारी वाहने याच रस्त्यावरून धावतात. दिवसभरात वळालेल्या वाहतुकीसाठी रस्त्याचा किमान सात तास वापर होतो. हा रस्ता मुळातच सहा मीटरचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. म्हणूनच रस्ता शंभर मीटरचा व्हायला हवा. दारणा नदीला पूर आल्यावर हा रस्ता बंद होतो. चिंच रोड वापरावा लागतो. हा रस्ता नसता, तर मग मात्र पूर ओसरण्याची वाट पाहत गावात बसण्याची वेळ चाडेगाववासीयांवर कायम आली असती. याही प्रश्‍नाचा विचार करता चाडेगावकडे वळणाऱ्या भागातील रस्त्यावरील मोरीची उंची वाढवण्यात यावी; अन्यथा पुलाचे बांधकाम होणे अत्यंत आवश्‍यक आहे.
- कचरू हुळहुळे

जागा दिली अन्‌ ओढवून घेतली नापिकी
गटारीच्या पाण्याच्या वाहिनीसाठी जागा दिली आणि नापिकी ओढावून घेतली, याचे विदारक चित्र चाडेगावमध्ये पाहायला मिळाले. गटारीच्या पाण्याच्या वाहिनीसाठी जागा दिली नसते, तर ती घेतली जाणार होती. त्यामुळे कसलाही विरोध न करता शेतातून जागा दिली. आता गटारीच्या पाण्याची गळती सुरू झाल्याने वावरात गटारीच्या पाण्याचा डोह साठतो आणि त्यातून पिकाचे नुकसान होते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

व्यायामशाळा कसली तो तर देशी बार
चाडेगावमध्ये व्यायामशाळा उभारण्यात आली होती. तिच्या देखभालीकडे स्थानिकांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आता स्थानिकच ही व्यायमशाळा कसली, तो तर देशी बार झाल्याची तक्रार करताहेत. व्यायामशाळेतील साहित्य चोरीला गेल्याचे स्थानिक सांगतात. व्यायामशाळेचा देशी दारू ढोसण्यासाठी वापर होत असल्याचे लोक तावातावाने सांगत होते. चाडेगावमध्ये महापालिकेतर्फे देखणा सभामंडप उभारण्यात आला आहे. स्थानिकांनी मंदिराच्या कळसाचे काम स्वतःहून केले. तसेच याच सभामंडपाच्या मागील बाजूला असलेली मोकळी जागा पडून कशी आहे, याची माहिती घेतल्यावर स्थानिकांच्या वादातून या जागेवर काम झाले नसल्याची माहिती मिळाली. याठिकाणी कथडा बांधण्यात आला आहे; पण आमच्या घरापुढे काही नको, अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

शौचालयाचे पाणी उघड्या गटारींमधून सोडण्यात येते. त्यामुळे दुर्गंधीने घरात जेवणे करणे कठीण होते. त्याबद्दलची वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिकांना उघड्या गटारींमुळे होणारा त्रास संपुष्टात आणण्यासाठी भूमिगत गटारी होणे गरजेचे आहे.
- सुदाम मानकर, स्थानिक रहिवासी

महापालिकेत चाडेगावचा समावेश झाल्यावर नळाने पाणी मिळू लागले आहे; पण पथदीपांचा प्रश्‍न कायम आहे. पथदीप आहेत; पण ते चालत नाहीत. त्याबद्दल सातत्याने सांगूनही महापालिका आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आमच्याकडून शहरासारखा कर घेतात म्हटल्यावर पथदीप शहराप्रमाणे कायमस्वरूपी सुरू राहतील, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.
- विठोबा वाघ, स्थानिक रहिवासी

चिंचचा रस्ता, वाघमळा या भागात गटारीच्या पाण्याची व्यवस्था व्हायला हवी. तसेच आजपर्यंत झाले ते झाले असे मानून आता आमच्या पुढच्या पिढीला किमान आपण शहरात राहतो याचा अभिमान वाटावा इतक्‍या नागरी सुविधा चाडेगावमध्ये पोचायला हव्यात. आमची उपेक्षा करणे तातडीने थांबणे गरजेचे आहे.
- बाळू मानकर, स्थानिक रहिवासी
(उद्याच्या अंकात : देवळालीगाव)

Web Title: hundred feet tar road need in chadegaon in nashik