आरम नदीच्या संवर्धनासाठी 'सकाळ'च्या पुढाकारातून सरसावले शेकडो हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे.

सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती घेतलेल्या 'नद्यांचे पुनरुज्जीवन' या उपक्रमांतर्गत सटाणा नगरपरिषद, देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ देवमामलेदार, रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, बागलाण अकेडमी, साईसावली प्रतिष्ठान, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना व लोकसहभागातून काल मंगळवार (ता.५) रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील आरम नदी स्वच्छता व संवर्धन प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. 'सकाळ' च्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात लोकसहभागही उत्स्फूर्तपणे दिसून आला.

सकाळी दहा वाजता येथील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील जिजामाता उद्यानालगत आरम नदीपात्रात नगराध्यक्ष सुनिल मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून 'सकाळ' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख व बागलाणचे अकेडमीचे संस्थापक आनंद महाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अरविंद सोनवणे, पालिकेतील गटनेते नितीन सोनवणे, महेश देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता डी.एस.घाडगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. उमेश बिरारी, सचिव प्रदीप बच्छाव, प्रल्हाद पाटील, डॉ.प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे हेमंत सोनवणे, रमेश सोनवणे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अभिजीत बागड, ज.ल.पाटील आदी उपस्थित होते.

जोपर्यत आरम नदीपात्र स्वच्छ होत नाही, तोपर्यत हे काम अविरत सुरु राहणार आहे. आरम नदीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी या कामात योगदान देणे गरजेचे आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शहरातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, संघटनांनी आपापले बूट, चप्पल बाजूला काढून या राजकारणविरहीत सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग द्यावा, असे मतही काही नागरिकांनी नोंदवले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनी या अभियानात राबत असलेल्यांना पिण्यासाठी मोफत थंड पाणी उपलब्ध करून दिले आहे. तर श्री हरीओम नागरी पतसंस्थेतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने जेसीबी व पोकलेंड मशीन उपलब्ध करून दिले आहे. 

यावेळी नगरसेवक दीपक पाकळे, बाळासाहेब बागुल, नगरसेविका पुष्पा सुर्यवंशी, डॉ.विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, सुनिता मोरकर, सुरेखा बच्छाव, भारती सूर्यवंशी, शमा मन्सुरी, सुवर्णा नंदाळे, दत्तू बैताडे, शरद शेवाळे, किरण सोनवणे, श्याम बगडाणे, पंकज सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रावसाहेब भुसारे, जनार्दन सूर्यवंशी, पालिकेचे बांधकाम अभियंता शालीमार कोर, ज्ञानेश्वर पवार, डी.डी. सोनवणे, डॉक्टर्स संघटनेचे डॉ.अमोल पवार, रोटरी क्लबचे डॉ.मनोज शिंदे, अभिजित सोनवणे, रामदास पाटील, उमेश सोनी, योगेश अहिरे, नंदकिशोर शेवाळे, पंडितराव अहिरे, संदीप देवरे, प्रा.प्रफुल्ल ठाकरे, पवन काला, श्लोक सोनवणे, किशोर ह्याळीज, योगेश जाधव, शुभम पाटील, विशाल जगताप, अक्तर शहा, निर्मल बिनायक्या, उमेश खैरनार, सागर बधान, कल्पेश जाधव, प्रशांत सोळुंखे, देव अहिरे, सुमित जाधव, अरुण शिंदे, 'सकाळ' चे बातमीदार अंबादास देवरे, रोशन खैरनार, रणधीर भामरे, बाळा कुवर, दिनेश सोनवणे, महेश भामरे, तुषार रौंदळ, रमेश बोरसे, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) राजेंद्र महाजन, मधुकर देवरे, सुनील गवळी आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आरम नदीपात्रातून होत असलेल्या बेकायदा अमर्याद वाळू उपश्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचल्याने प्रदूषण वाढले आहे. गाढवांवर वाळू वाहून नेत नदीपात्राबाहेर उभ्या असलेल्या वाहनात टाकून पुढे चढ्या दराने विक्रीसाठी वाळू पाठविली जाते. फक्त नदीपात्र स्वच्छ करणे एवढ्यावर न थांबता या प्रकारच्या वाळू उपश्यावर बंदी आणण्याचा ठराव पालिकेने करावा. यापुढे वाळू चोरी थांबविण्यास प्राधान्य द्यावे, असे मत उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

'दै.सकाळ' चा नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमातून आरम नदीला गतवैभव प्राप्त होणार असल्याने आनंद आहे. आरम नदी संवर्धनामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून उत्तर महाराष्ट्रातील एक सुंदर नदी म्हणून आरम नदी नावारूपास येणार आहे. त्यासाठी सर्व ताकदीनिशी पालिका प्रशासन या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करेल.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सनपा

नद्या या दोन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नद्या जलवाहिन्या नसून जीवनवाहिन्या आहेत. मात्र नद्यांना सध्या गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 'सकाळ माध्यम समूहा' ने यापूर्वी गोदावरी स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष व लोकसहभागातून जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरातील नद्यांची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी 'सकाळ' ने पुढाकार घेतला आहे. या सर्व घटकांनी प्रयत्न केल्यास नद्या निश्चितच स्वच्छ होतील, असा ठाम विश्वास आहे. 
- श्रीमंत माने, संपादक, उत्तर महाराष्ट्र आवृत्ती, 'सकाळ'

'सकाळ माध्यम समूहा' ने जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली ही उपक्रमशील व अभिमामास्पद बाब आहे. आरम नदीची कायमस्वरूपी स्वच्छता व संवर्धन करणे ही सामुहिक जबाबदारी ओळखून प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे. आरम नदी स्वच्छ झाल्यास शहरपाणीपुरवठा योजना व शेतीसिंचनाच्या सर्व विहिरींचा उद्भव वाढण्यास मदत होणार आहे. 
- संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundreds of hands have emerged from the 'Sakal' initiative for the cleaning of the river Aram