देवरगावमध्ये दीडशे वर्षांपूर्वीच्या कलाशैलींचा खजिना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक  - देवरगाव (ता. चांदवड) येथील चिरेबंदी शिंदे वाडा आहे. या वाड्यात दीडशे वर्षांपूर्वीच्या कलाशैलींचा खजिना सुस्थितीत आहे. लाकडी खांबावरील नक्षीकाम जोडीला नैसर्गिक रंगांनी रेखाटलेली चित्रकला वाड्याचे वैभव आहे. 

नाशिक  - देवरगाव (ता. चांदवड) येथील चिरेबंदी शिंदे वाडा आहे. या वाड्यात दीडशे वर्षांपूर्वीच्या कलाशैलींचा खजिना सुस्थितीत आहे. लाकडी खांबावरील नक्षीकाम जोडीला नैसर्गिक रंगांनी रेखाटलेली चित्रकला वाड्याचे वैभव आहे. 

शिंदेवाडा दोन एकरात पसरलेला आहे. वाड्याचे दोन भाग बघावयास मिळतात. त्यातील एका भागात राजे सयाजीराव गायकवाड यांचे सेनापती भाऊसाहेब शिंदे यांचे वंशज आबासाहेब शिंदे राहतात. वाड्याचे प्रवेशद्वार अन्‌ बाहेरील लाकडीआधार खांबावरील सुंदर नक्षीकामाच्या मूर्ती नजरेतून सुटू शकत नाहीत. वाड्याचे बांधकाम चुण्यात करण्यात आले आहे. वाड्यात जुनी विहीर आहे. तिला पायऱ्या आहेत. वाड्यात गेल्यावर बाजूच्या खोलीत विविध चित्रांच्या फ्रेम पाहायला मिळतात. तसेच दिवाणखान्यातील भिंतीवर चित्रकलेचे विश्‍व पाहायला मिळते. दीडशे वर्षांपूर्वी ही चित्रे हाताने रेखाटण्यात आली आहेत. जमिनीवर पडलेला रावण, हत्तीवरील पालखी-पहारेकरी, साधू, गणेश, अभ्यास करणारी मुले, शिक्षक, काळवीट, पोपट, आड, नरसिंह, युद्ध, छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार अशी विविध चित्रे नैसर्गिक रंगातील आहेत. हा ऐवज डोळे भरून पाहत बसावे, असे प्रत्येकाला वाटल्याखेरीज राहत नाही. ही चित्रकला संदेश देत आहे. 

वास्तुशास्त्राचा अनोखा नमुना 
नववधू घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येत असलेली लाकडी डोली ऐतिहासिक परंपरेची साक्ष देत आहे. पुरातन भांडी व इतर वस्तूदेखील या वाड्यात आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाड्यातील पाणी व्यवस्थापनेचे मूर्तिमंत दाखला मिळतो. पंखा नसतानाही आताच्या उकाड्यात गारवा वाड्यामध्ये आहे. हे सारे वास्तुशास्त्राचा अनोखा नमुना आहे. 

""शिंदेवाडा दीडशे वर्षांपूर्वी बांधला गेलाय. वाड्यातील भिंतीवरील चित्र सुस्थितीत असलेला हा आमचा एकमेव वाडा आहे. घरातील माणसे कमी व वाडा मोठा अशी परिस्थिती तयार झाल्याने वाड्याचा सांभाळ करणे कठीण बनले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कलाशैलीच्या संवर्धनासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. 
- आबासाहेब शिंदे (सेनापती भाऊसाहेब शिंदे यांचे वंशज) 

Web Title: Hundreds of years ago art genres treasure in Devargaon