माझी किडनी मला परत द्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

पतीला स्वतःचे एक मूत्रपिंड देऊन त्याला जीवदान देणाऱ्या आणि त्याच्या साथीने संसार फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पत्नीला अखेर हार मानावी लागली आहे. पती व्यसन सोडण्यास तयार नाही. व्यसनामुळे सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीला दिलेले मूत्रपिंड परत मिळावे म्हणून पत्नीला थेट पोलिस ठाणे गाठावे लागले आहे.

पतीला दिलेल्या मूत्रपिंडासाठी पत्नीची पोलिसांकडे धाव
सातपूर (जि. नाशिक) - पतीला स्वतःचे एक मूत्रपिंड देऊन त्याला जीवदान देणाऱ्या आणि त्याच्या साथीने संसार फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पत्नीला अखेर हार मानावी लागली आहे. पती व्यसन सोडण्यास तयार नाही. व्यसनामुळे सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीला दिलेले मूत्रपिंड परत मिळावे म्हणून पत्नीला थेट पोलिस ठाणे गाठावे लागले आहे.

शहरात रविवारी (ता. 16) पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाला फेरे मारत असतानाच वैशाली रणदिवे (वय 27) या विवाहिता सातपूर पोलिस ठाण्यात अश्रू ढाळत आल्या. सुरवातीला शेजारील किरकोळ भांडण असेल म्हणून हवालदारांनी वरवर विचारपूस केली. अश्रूंना वाट करून देत तिने आपल्यावर होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचा पाढा वाचला. विक्रम रणदिवे याला व्यसन होते, असे असतानाही आई- वडील व नातेवाइकांनी त्याच्यासोबत वैशालीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसांतच विक्रम आजारी पडला. त्याची दोन्ही मूत्रपिंडं निकामी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत दिसले. पती थोड्याच दिवसांचा सोबती आहे; पण एखाद्याने मूत्रपिंड दान केल्यास त्याचा जीव वाचू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. पतीचा जीव वाचावा व आपल्या संसाराची वेल फुलावी म्हणून वैशालीने नातेवाइकांचा विरोध डावलून स्वत:चे मूत्रपिंड पतीला दिले.

बरे वाटू लागल्यानंतर काही दिवसांतच विक्रम पुन्हा नशेच्या आहारी गेला व आपला प्रताप दाखवण्यास पुन्हा सुरवात केली. जीव वाचवणाऱ्या पत्नीचाच जीवघेणा छळ सुरू झाल्याने त्रासलेल्या वैशालीने सातपूर पोलिस ठाणे गाठत पतीस दान केलेले मूत्रपिंड परत मिळावे, म्हणून तक्रार अर्ज केला आहे. तिच्या या विचित्र तक्रारीमुळे पोलिसही हतबल झाले आहेत. समुपदेशनाने या तक्रारीची सोडवणूक करता येईल का, याची ते चाचपणी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband Kidney return demand by wife