पण, मी गटनेत्याचा बाप आहे ना...!

yeola
yeola

येवला : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे 9 मतदारांना घेऊन आले तेव्हा, पक्ष निरीक्षक बापू भुजबळ यांनी, मी वाट पाहत होतो, असा प्रश्न केला. यावर माणिकरावांनी तुम्ही कधी मला फोन केला असे उत्तर दिले. यावर भुजबळांनी मी गटनेत्याच्या (म्हणजे संकेत शिंदे) संपर्कात होतो असे सांगताच हजरजबाबी माणिकरावांनी पण मी गटनेत्याचा बाप आहे. असे सुनावत भुजबळांची बोलती बंद केलीच पण यावर एकच हशा पिकला...

येथील मतदान केंद्राबाहेरील सर्वपक्षीय नेत्यांमधील या राजकीय गुगलीने टोमण्यांनी चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे चित्र दिसले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील लिंबाच्या दाट सावलीखाली खुर्च्या टाकून नेत्यांसह समर्थक सकाळी आठ वाजेपासून तर चार वाजेपर्यंत बसलेले होते. सुरुवातीला चार तास मतदारांचा पत्ताच नसल्याने जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे काम पोलिसांना करावे लागले, मतदानाचा हक्क नसताना हे लोक जमले कसे असा सवालही पोलिसांना पडला. दुपारनंतर मात्र प्रमुख नेत्यांसह समर्थक जमा झाले, मतदार मतदानासाठी येत नसल्याने कोणतीही गाडी आली तरी गर्दीचे लक्ष मतदार आले म्हणत गाडीकडे जात होते.

याच उत्सुकतेत असताना राष्ट्रवादीचे मतदार संजय बनकर,प्रवीण बनकर व महेंद्र काले या ठिकाणी आले.येथे दराडे समर्थक असलेले भाजपाचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर तसेच गणेश शिंदे यांनी हस्तांदोलन करताना त्यांना लक्ष असू दया..अशी गळ घातली.

माणिकरावांनी केंद्रावर आल्यावर, काय पहिलवान,तुम्ही (भाजपाने) स्वतःहून फजिती करून घेतली..असे म्हणत नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांना टोमणा मारत बोलते केले.यावर क्षीरसागरांनी काही नाही भाऊ बरोबर आहे सगळे.., असे उत्तर देत येथे शिवसेना-भाजपात आलबेल असल्याचे चित्र जिल्ह्यात असल्याचे संकेत दिले.सर्वपक्षीय नेते पदाधिकारी फोटोसेशनसाठी एकत्र आल्यावर माणिकरावांनी मागे थांबून असलेले शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांना, राजे...,फोटोसाठी तरी एकत्र या! अशी गुगली टाकून बोलवून घेतले.

भाजपचे सर्वच मतदार केंद्राबाहेर असले तरी मतदान करण्यासाठी जात नसल्याने क्षीरसागरांना विचारणा केली असता त्यांनी साडेतीन वाजेचा मुहूर्त असल्याचे सांगितले.यावर शिंदेसह शिवसेना नेते संभाजी पवार व पत्रकारांनी गुगली टाकत पहिलवान कुणाच्या तरी फोनची वाट पाहत असतील असा टोमणा मारला.मात्र क्षीरसागरांनी स्मितहास्य करून मुहूर्ताची वेळ जवळ आल्याने मतदानासाठी केंद्राकडे काढता पाय घेतला.दराडे स्थानिक उमेदवार असल्याने राष्ट्रवादीचे केंद्राबाहेर असलेले मोजके हजर पदाधिकारी पक्षाचा आदेश म्हणून आलोय असे सांगत होते.भाजपाचे संजय सोमासे यांनी आपल्या मित्रांना निकाल सांगताना,येवल्यात गुलाल पडणारच आहे.. (म्हणजे दराडे निवडले तरी अन शहाणे निवडले तरी) असे हजरजबाबी उत्तर देत विचारण्याला निरुत्तर केले.एकूणच केंद्राबाहेर जुंपलेल्या या जुगलबंदीने उपस्थिताची चांगलीच करमणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com