चारीचे काम न झाल्यास लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सटाणा : बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठचे काम गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असून प्रत्येक निवडणुकांमध्ये राज्य शासन व लोकप्रतिनिधींकडून खोटी आश्वासनेच दिली जातात. मात्र शेतकरी हक्काच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. येत्या महिनाभरात शासनाने चारीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करावी अन्यथा लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करून १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि लाभक्षेत्रातील गावांमध्ये निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात येईल असा संतप्त इशारा केळझर चारी क्रमांक आठ कृती समितीतर्फे आज गुरुवार (ता.५) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर शेवाळे, उपाध्यक्ष नाना मोरकर महाराणा प्रताप क्रांतीदलाचे उपाध्यक्ष लखन पवार, यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, गेल्या २० वर्षांपासून केळझर चारी क्रमांक आठ चे काम प्रलंबित आहे. सन १९९९ मध्ये सुरु झालेल्या चारीच्या कामास आजपर्यंत २ कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले असून २ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरवर्षी निधी मंजूर होऊनही हे काम पूर्ण का होऊ शकले नाही, हा प्रश्न जनतेला सतावत आहे. केळझर धरणाचे पाणी येणार आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होणार या वेड्या आशेने शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी चारीसाठी दिल्या. मात्र अजूनही शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.

चारीचे काम मार्गी लागण्यासाठी आम्ही वेळोवेळी उपोषणे व आंदोलने केली असून नागपूर अधिवेशनात मोर्चा काढून मंत्र्यांची भेट देखील घेतली होती. परंतु शासन व लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासनांपलीकडे काहीच मिळालेले नाही. प्रत्येक निवडणुकीत मते मिळविण्यासाठी चारीचे काम मार्गी लागण्याचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली जाते.

चारीचे काम पूर्ण झाल्यास १८ ते २० गावांचा पिण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. सध्या या भागातील शेतकरी व जनता पाण्याच्या टंचाईमुळे मेटाकुटीला आली आहे. शासनाने महिनाभरात चारीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली नाही तर सर्वपक्षीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जाईल आणि १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून लाभक्षेत्रातील गावांमध्ये निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात येईल असा संतप्त इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, प्रहार शेतकरी संघटनेतर्फेही या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे, प्रभाकर रौंदळ, चौगावचे माजी सरपंच बापू शेवाळे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, योगेश सूर्यवंशी, सुधाकर पाटील, योगेश दातरे, कपिल सोनवणे, प्रवीण निकम, हेमंत निकम, देविदास रौंदळ, महेश निकम, महेश पवार, राजेंद्र मोहन, अरुण मोहन, किरण पवार, अनिल रौंदळ, सुनील सोनवणे, ओंकार पवार, समाधान ठोके, राहुल खरे, संजय जाधव, संजय शेवाळे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

या आहेत केळझर चारी क्रमांक आठ कृती समितीच्या प्रमुख मागण्या...
- शासनाने कान्हेरी नदीवरील काम पूर्ण करून मुळाण्यापर्यंत पाणी पोहोचवावे 
- डोंगरेज ते मुळाणे हे ११ किलोमीटर अंतराचे काम तातडीने पूर्ण करावे
- केळझर धरणात पाणीसाठा वाढविण्यासाठी वळण बंधारे बांधावेत
- चारीचे काम मुळाण्यापर्यंत पूर्ण होत असताना पुढील कामाचा प्रस्ताव तयार करावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if work is not done then representative and leaders are not allowed to enter in village