सिंचन प्रकल्पांची कामे सुरु न झाल्यास बागलाण तहसीलसमोर बेमुदत उपोषण छेडणार

If the works of irrigation projects are not initiated the hunger strike will be launched at Baglan Tehsil
If the works of irrigation projects are not initiated the hunger strike will be launched at Baglan Tehsil

सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामास अद्यापही सुरवात न होणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पाणीप्रश्नाबाबत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. येत्या महिनाभरात तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची कामे सुरु झाली नाही तर बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा संतप्त इशारा बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल शनिवार (ता. 7) रोजी येथे केले.

येथील पंचायत समितीच्या आवरात आयोजित आमसभेच्या अध्यक्षपदावरून आमदार सौ. चव्हाण बोलत होत्या. व्यासपीठावर बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, रामचंद्रबापू पाटील, पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य लता बच्छाव, रेखा पवार, गणेश अहिरे, कान्हू गायकवाड, यशवंत पाटील, डॉ. विलास बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, भिकानाना सोनवणे, यशवंत अहिरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, पंचायत समिती सदस्य अशोक अहिरे आदी उपस्थित होते. 

आमदार सौ. चव्हाण म्हणाल्या, बागलाण तालुक्याला दरवर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी गेल्या तीन ते चार वर्षात तालुक्यातील तळवाडे भामेर पोहोच कालवा, हरणबारी डावा कालवा, केळझर चारी क्रमांक आठ या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधी देखील उपलब्ध केला आहे. मात्र काही ठिकाणी जनतेने केलेल्या विरोधामुळे ही कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. या हरणबारी व चणकापूर धरणांचे आवर्तन तात्काळ सोडावे यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. 

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत गेल्या तीन वर्षात तालुक्यात भरपूर कामे झाली असून पाण्याचा थेंब अन थेंब वाचविण्याचा प्रयत्न आहे. तालुका टँकरमुक्त करण्यासाठी टँकर सुरु असलेल्या टंचाईग्रस्त गावांना मोसम, आरम व गिरणा नदीपात्रातून नवीन पाणीपुरवठा योजना सुरु करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न करावेत. संबंधित योजना मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

यावेळी सभेत तालुक्यातील सिंचन, वीज, आरोग्य व इतर महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. पाणीटंचाईबरोबरच विजेचा प्रश्न सोडविण्यास प्रशासन सतर्कतेने काम करीत नसल्याचा आरोप अनेक नागरिकांनी सभेत केला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रा. के. एन. अहिरे यांनी वांजुळ पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी शासनाने साडेतीन कोटी रुपये मंजूर करावा असा ठराव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

ठेंगोडा येथे सध्या जमिनीचे भाव 10 लाख एकरी असताना अवसायानात गेलेल्या सुतगिरणीच्या 48 एकर जमीनीची विक्री अवघ्या 48 लाख रुपयांमध्ये झाली असून बँकेचे थकीत कर्ज भरण्यासाठी गिरणीच्या यंत्र सामुग्रीचा लिलाव केला जातो, मात्र गिरणीतील विस्थापित कामगारांना देण्यासाठी शासन पैसा उपलब्ध करू शकत नाहीत, असा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश देसले यांनी केली.

तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांवरील थकीत वीजबिलांच्या सक्तीच्या वसुलीस स्थगिती देण्याची सूचना आमदार सौ.चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिली. मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार यांनी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच गावालगत असलेल्या आरम नदीमध्ये भूमिगत बंधारा बांधण्याची मागणी केली. नामपूरच्या सरपंच शीतल पवार यांनी गावातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हरणबारी धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. 

अजमेर सौंदाणे येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई असून सध्या गावात 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गावासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी जितेंद्र पवार यांनी केली. वीज वितरण कंपनीने तालुक्यात सन 1972 पासून विद्युत तारा अद्यापही बदलल्या नसून जीर्ण तारा त्वरित बदलण्याची मागणी टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी केली. नवे निरपूरच्या सरपंच शीतल पवार यांनी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. तर नारायण खैरनार यांनी तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. सटाणा शहरातील चौगाव रस्त्यावरील कचरा डेपोतील उडणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील शेती नापिकी होण्याची परीस्थिती निर्माण झाली असून पालिका प्रशासनाने त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भिका सोनवणे यांनी केली. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर अवैधरीत्या उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रवीण पवार यांनी केली. तर केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या दोन महिन्यात सुरु करावे अशी मागणी भाक्षीचे माजी सरपंच श्रीकांत रौंदळ यांनी केली. तरसाळीचे सरपंच लखन पवार यांनी तालुक्यातील गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ आदी योजनांची प्रकरणे त्वरित निकाली काढून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी केली.
सभेस तहसीलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, तालुका कृषी अधिकारी डी.के.कापडणीस, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पाटील, शाखा अभियंता अशोक पाटील, केदा काकुळते, भावसिंग पवार, अरुण सोनवणे, नगरसेविका सुरेखा बच्छाव आदींसह तालुक्यातील शासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ व ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. विस्त्र अधिकारी नितीन देशमुख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले. 

एकेकाळी बागलाणचे वैभव असलेल्या ठेंगोडा सुतगिरणी अधिकारी आणि राजकारण्यांमुळे नामशेष झाली आहे. ही सुतगिरणी अवसायनात गेल्यामुळे आठशे कामगारांच्या कुटुंबाची चूल विझली. गिरणी कामगारांचे सहा कोटी रुपयांचे देणे देण्यासाठी यंत्र सामुग्रीचा लिलाव केला जातो मात्र अद्याप एक पैसा देखील कामगारांना मिळू शकलेला नाही. आता देखील बँकेचे थकीत कर्ज भरण्यासाठी अवसायक तथा सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांच्या उदासीनतेमुळे 48 एकर जमीनीची अवघ्या 95 लाख रुपयांमध्ये विक्री झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यशवंत पाटील यांनी थेट सहाय्यक निबंधक विघ्ने यांनाच धारेवर धरले. विघ्ने यांच्या भोंगळ कारभारामुळेच या जमिनीचा लिलाव झाल्याचा आरोप श्री.पाटील यांनी यावेळी केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com