मालमत्ता कर अदा न केल्यास पाणीपुरवठा खंडित - रवींद्र जगताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मालेगाव - महापालिकेला या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी सुमारे ४८ कोटी रुपये उद्दिष्ट आहे. 

मालेगाव - महापालिकेला या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी सुमारे ४८ कोटी रुपये उद्दिष्ट आहे. 

जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १५ कोटी रुपये वसुली झाली आहे. मोबाईल टॉवर करासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्याने सुमारे ९० लाख रुपये संबंधित टॉवर कंपन्यांकडून वसूल होणार आहेत. मार्च तोंडावर येऊन ठेपला असताना वसुली समाधानकारक नसल्याने वसुलीसाठी कठोर कारवाईच्या सूचना मालमत्ता कर वसुली विभागाला देण्यात आल्याचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले.श्री. जगताप यांनी आज घरपट्टी विभागाची बैठक घेऊन वसुलीचा आढावा घेतला. एकूण १५ कोटी वसुलीपैकी नोटबंदी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरच्या काही दिवसांतच आठ कोटी ८० लाख ५० हजार ५९६ रुपये वसुली झाली. नोव्हेंबर वगळता उर्वरित एप्रिल ते जानेवारीत सरासरी अवघे पाच ते सहा लाख रुपये वसुली झाली. दरम्यान, उद्यापासून मालमत्ता कर विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसुली मोहिमेस सुरवात करणार आहेत. दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नळजोडणी खंडित करण्याची कारवाई तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे घरपट्टी अधीक्षक एकलाख अहमद यांनी सांगितले. याबरोबरच प्रशासनाने बिल अदा केल्यानंतर २१ दिवसांत भरणा न करणाऱ्यांना दरमहा दोन टक्के याप्रमाणे व्याज आकारणी करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी कठोर कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी, नळपट्टीसह मालमत्ता कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

Web Title: If you do not pay property tax break water